मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या ५ नगरपालिकांसाठी २३ एप्रिलला निवडणूक
२६ एप्रिल या दिवशी निकाल
केवळ ५ नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यासाठी३ दिवस कशासाठी ? हीच का निवडणूक यंत्रणेची कार्यक्षमता ?
पणजी, ३० मार्च (वार्ता.) – राज्य निवडणूक आयोगाने मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या ५ नगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम ३० मार्च या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत घोषित केला. राज्य निवडणूक आयुक्त व्ही. रमणमूर्ती यांनी ही घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने या पालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून ती मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २६ एप्रिलपर्यंत कायम रहाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
- उमेदवारी अर्ज स्वीकारणार – ३१ मार्च ते ८ एप्रिल
- उमेदवारी अर्जांची छाननी – ९ एप्रिल
- उमेदवारी अर्ज मागे घेणे – १० एप्रिल
- उमेदवारांची अंतिम सूची घोषित करणे – १० एप्रिलला दुपारी ३ वाजल्यानंतर
- मतदानाची वेळ – २३ एप्रिल या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५. यांपैकी शेवटचा एक घंटा म्हणजे दुपारी ४ ते सायंकाळी ५ ही वेळ कोरोनाबाधित रुग्णांच्या मतदानासाठी आहे.
- मतमोजणी – २६ एप्रिल २०२१
संचारबंदी नियमाचा निवडणूक प्रचारावर होणार्या परिणामाविषयी जिल्हाधिकार्यांकडे चर्चा करणार
राज्य निवडणूक आयुक्त व्ही. रमणमूर्ती पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, ‘‘पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्रितपणे प्रचारासाठी फिरणार आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी चालू झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावर होऊ शकतो. याविषयी मी जिल्हाधिकार्यांशी चर्चा करणार आहे आणि जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतील. निवडणूक प्रचारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी अन् फिरते पथक प्रचारावर देखरेख ठेवणार आहे.’’
प्रभाग आरक्षणाचे सूत्र न्यायप्रविष्ट असले, तरी निवडणूक प्रक्रिया चालूच रहाणार
आयुक्त व्ही. रमणमूर्ती पुढे म्हणाले, ‘‘५ नगरपालिकांतील प्रभाग आरक्षणाशी संबंधित एक याचिका वगळता इतर सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणी एक याचिका समाविष्ट (अॅडमिट) करून घेतलेली असली, तरी न्यायालयाने निवडणुकीशी संबंधित कोणताही अंतरिम आदेश दिलेला नाही. यामुळे निवडणूक प्रक्रिया चालू रहाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.’’