पुणे येथील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना मृत्यू का ? – केंद्रीय आरोग्य सचिवांचा प्रश्न
पुणे, ३० मार्च – कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे घेतलेल्या बैठकीला पुणे आणि मुंबई येथील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी अग्रवाल यांनी पुणे-मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या संसर्गाविषयी विचारणा केली. तसेच ‘ससून’ रुग्णालयात कोरोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू का होत आहेत ?’, असा प्रश्नही या बैठकीत करण्यात आला. संसर्गजन्य रोगांचा आरंभ पुण्यातून का होतो, तसेच ‘सार्स’, ‘स्वाइन फ्लू’ आणि आता कोरोना अशा संसर्गजन्य रोगांचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात का सापडतात ? अशी विचारणाही या बैठकीत करण्यात आली.
प्रश्नांना उत्तर देतांना ससून प्रशासनाने सांगितले, ‘रुग्णालयात गंभीर रुग्ण ऐनवेळीच येतात. वाढता संसर्ग कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’मुळे असून दुसरी लाट पहिल्यापेक्षा गंभीर असली, तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण अल्प आहे.’
अग्रवाल यांनी अधिकाधिक चाचण्या वाढवाव्यात, यावर अधिक भर दिला आहे. सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रे सिद्ध करून तेथे कडक कार्यवाही करण्याच्या सूचना करतांना आवश्यकता असेल, तरच दळणवळण बंदीचा निर्णय घ्या, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला.