घुसण्याचा प्रयत्न करणार्या म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका ! – मणिपूर सरकारचा सीमेलगतच्या ५ जिल्ह्यांना आदेश
म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !
इंफाळ (मणिपूर) – भारताच्या शेजारी असणार्या म्यानमारमध्ये सैन्याने सत्ता हस्तगत केल्यावर तेथील जनतेकडून प्रचंड विरोध होत आहे. अशा परिस्थितीत म्यानमारमधील नागरिक भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मणीपूर सरकारने राज्याच्या सीमेला लागून असलेल्या ५ जिल्ह्यांना ‘म्यानमारच्या नागरिकांना भारतात शिरू देऊ नये, निर्वासितांसाठी शिबिरे आयोजित केली जाऊ नयेत आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाऊ नये’, असे आदेश दिले आहेत. केवळ गंभीररित्या घायाळ असलेल्या लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून उपचार दिले जाऊ शकतात, असाही आदेश देण्यात आला आहे. ‘कुणी शरणागती पत्करली, तर त्यांना हात जोडून परत पाठवा’, असे सांगण्यात आले आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे म्यानमारच्या निर्वासितांना भारतात शरण, अन्न आणि आश्रय देण्याची विनंती केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे.