समष्टीच्या आनंदाने आनंदी होणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती मनात अपार भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अपाला औंधकर ही एक आहे !
रत्नागिरी येथील बालसाधिका कु. अपाला औंधकर हिचा फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया, ३०.३.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात संगीतविषयी साधना करणार्या साधिकांना जाणवलेली तिची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
मागील भागात अपालामधील शिकण्याची वृत्ती, सकारात्मकता, इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती इत्यादी गुण पाहिले. आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/463939.html
६. सकारात्मकता
६ आ. आश्रमातून घरी जायचे निश्चित झाल्यावर सकारात्मक राहून घरी करावयाच्या प्रयत्नांविषयी चिंतन लिहून काढणे : ‘अपाला काही मास रामनाथी आश्रमात रहायला होती; काही कारणास्तव तिला घरी जावे लागत होते. तेव्हाही ती सकारात्मक होती. ‘घरी गेल्यावर साधनेचे काय प्रयत्न करायचे ?’, याचे चिंतन तिने लिहून काढले.’
– कु. शर्वरी आणि कु. ऐश्वर्या रायकर
७. इतरांंना साधनेसाठी साहाय्य करणारी अपाला !
७ अ. इतरांना प्रेमाने चूक सांगणे : ‘मी अपालाला ‘आज तुला माझी कुठली चूक लक्षात आली ?’, असे विचारल्यावर ती मला माझी चूक एवढ्या प्रेमाने सांगायची की, ती चूक माझ्याकडून लगेच स्वीकारली जायची. काही प्रसंगात माझी चूक होण्यापूर्वीच अपाला मला सतर्क करून योग्य कृती सांगून साहाय्य करते.’
– कु. शर्वरी
७ आ. चुकांमुळे निराश झालेल्या साधिकेशी प्रेमाने बोलून तिला आधार देणे आणि इतरांनाही तिला साहाय्य करण्यासाठी प्रवृत्त करणे : ‘एकदा एका साधिकेच्या चुका झाल्यामुळे ती थोडी निराश झाली होती. तेव्हा अपाला तिच्याशी प्रेमाने बोलली आणि मला म्हणाली, ‘‘ताई थोडी निराश आहे. तिला भावजागृतीसाठी काहीतरी छान ऐकव. आपल्याला तिला त्या विचारांमध्ये अडकू द्यायचे नाही. तिने त्यातून लवकर बाहेर पडायला हवे. तू तिला साहाय्य कर.’’ तेव्हा ‘तिला सर्वांची किती काळजी आहे ? आणि ‘कुणाचा निराशेत वेळ जायला नको’, याची तळमळही आहे’, असे वाटून मला अपालाचे फार कौतुक वाटले. ती लहान असूनही फार समंजस आहे.’
– कु. मयुरी आगावणे
८. साधनेची तळमळ !
८ अ. प्रत्येक सूत्र साधनेशी जोडून आध्यात्मिक स्तरावर राहून प्रयत्न करणारी अपाला !
८ अ १. नृत्यातील मुद्रांचा अभ्यास करण्याआधी भावप्रयोग करणे : ‘अपालाने नृत्यातील मुद्रांचा अभ्यास केला होता. प्रत्येक वेळी मुद्रांचा अभ्यास करायला आरंभ करण्यापूर्वी ती एक भावप्रयोग करायची आणि नंतर मुद्रांचा अभ्यास करायची. तिच्या नृत्याभ्यासाच्या धारिका पडताळण्यासाठी माझ्याकडे आल्या होत्या. तेव्हा मी त्यातील भावप्रयोग करून पहायचे आणि नंतर त्यातील सूत्रांचे संकलन अन् मुद्रांच्या अभ्यासाची सूत्रे या दृष्टीने वाचन करायचे. तेव्हा ते भावप्रयोग करतांना माझीही भावजागृती व्हायची. ‘मुद्रांच्या अभ्यासाला भावप्रयोगांची जोड देऊन ‘नृत्याभ्यास’ ही सेवा साधना म्हणून अजून चांगली कशी करता येईल ?’, ही अपालाची तळमळ मला शिकायला मिळाली.’
– कु. आरती तिवारी आणि कु. म्रिणालिनी देवघरे
८ अ २. एका साधिकेच्या अयोग्य वागण्याविषयी मनात आलेल्या विचारांवर व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मार्गदर्शन घेणे आणि ‘स्वतःमधील शरणागती वाढवायला हवी’, हे सूत्र लक्षात घेऊन तसे प्रयत्न करणे : ‘एकदा माझा एका साधिकेच्या संदर्भात एक प्रसंग घडला. काही कारणाने त्या साधिकेशी अपालाचाही संपर्क आला होता. त्या साधिकेच्या अयोग्य वागण्याचा अपालाला आणि मला सारखाच अनुभव आला. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू त्यातून कशी बाहेर पडलीस ? काय भाव ठेवलास ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘ताई, माझेही प्रथम त्या साधिकेच्या दोषाकडे लक्ष गेले; परंतु व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘याविषयी कसे प्रयत्न करू ?’, असे मी विचारल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझी शरणागती न्यून पडते. मी भगवंताच्या चरणी माझी लीनता वाढवायला हवी.’ त्याप्रमाणे मी आता प्रयत्न करते. आता मला त्या साधिकेशी समन्वय करतांना अडचण येत नाही आणि आली, तरी त्यावर मात करता येते.’’ हे ऐकून मलाही प्रयत्नांसाठी दिशा मिळाली.’
– कु. आरती तिवारी
९. भाव
९ अ. आश्रमाविषयी असलेला भाव : ‘एकदा ती मला तिच्या वाढदिवसाची तिच्या मैत्रिणींच्या समवेत काढलेली छायाचित्रे दाखवत होती. मी तिला म्हटले, ‘‘आता तुला इथे चांगले वाटते ना ?’’ तेव्हा इथेच मधील ‘च’ या अक्षरावर जोर देऊन ती म्हणाली, ‘‘नुसते इथे नाही, तर इथेच चांगले वाटते.’’
– सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी
९ आ. आश्रमात असलेल्या श्री भवानीदेवीविषयी असलेला भाव : ‘आश्रमात श्री भवानीदेवीचे मंदिर आहे. अपालाच्या मनात भवानीदेवीविषयी अपार भाव आहे. ती स्वतःला भवानीदेवीची पुत्री मानते. ती नित्य देवीच्या दर्शनाला जाते. तेव्हा तिला देवीविषयी विविध अनुभूती येतात.’
– कु. ऐश्वर्या रायकर, कु. अंजली कानस्कर आणि कु. म्रिणालिनी देवघरे
९ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव !
९ इ १. अपालाच्या मनाची स्थिती चांगली नसतांनाही तिने घेतलेल्या भावप्रयोगाने भावजागृती होऊन मन हलके होणे : ‘एकदा अपालाच्या मनाची स्थिती चांगली नव्हती. त्या वेळी आम्ही नृत्याच्या सरावाला गेलो होतो. ती मला म्हणाली, ‘‘ताई, मला आज काही करावेसे वाटत नाही.’’ मी तिला म्हणाले, ‘‘आपण भावप्रयोग करूया.’’ तेव्हा तिनेच भावप्रयोग घेतला. त्यात तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केले. तिने तो भावप्रयोग इतका सुंदर घेतला की, माझी भावजागृती झाली. तिने घेतलेल्या भावप्रयोगामध्ये इतकी निर्मळता आणि प्रांजळपणा होता की, माझेही मन फार हलके झाले. एक प्रकारे ‘त्या भावप्रयोगातून माझेही आत्मनिवेदन झाले’, असे मला वाटले.’
– कु. अंजली कानस्कर
१०. अपालामध्ये जाणवलेला पालट !
१० अ. स्वकोशात न रहाता सर्वांशी मिळूनमिसळून रहाणे : ‘यापूर्वी अपाला आश्रमात आली होती, तेव्हा ती स्वकोशातच रहायची; मात्र या वेळी आश्रमात आल्यावर तिने स्वतःमध्ये पालट केला. आता ती सर्वांमधे मिसळते आणि सर्वांशी बोलते. आता ती आम्हाला आमच्या लहान बहिणीप्रमाणेच वाटते.’
– कु. ऐश्वर्या, सौ. भक्ती कुलकर्णी आणि सौ. अनघा जोशी
१० आ. ‘अपालामधील आनंद, सेवेची तळमळ आणि भाव पुष्कळ वाढला आहे’, असे जाणवणे
१. ‘मी २ वर्षांनंतर अपालाला भेटत होते. अपालाला भेटल्यानंतर मला तिच्यात पुष्कळ पालट जाणवला. तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ आनंद दिसत होता. ‘आता ती अधिक अनुसंधानात आहे’, असे मला जाणवले.
२. ‘सुर ताल हुनर का कमाल’ या नृत्यस्पर्धेच्या सिद्धतेसाठी मी तिला साहाय्य करण्यासाठी गेले होते. तिचे नृत्य बघितल्यावर ‘आता तिच्या नृत्यात भाव आणि नृत्यसेवा करायची तळमळ आधीपेक्षा पुष्कळ अधिक वाढली आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
– कु. शर्वरी कानस्कर
११. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुमाऊली, अपालाप्रमाणेच आमच्यामधे तळमळ, भक्ती, प्रेमभाव, श्रद्धा असे अनेक गुण येऊ देत. ‘अपालासारखी आध्यात्मिक मैत्रिण आम्हाला लाभली’, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– संगीत सेवेतील सर्व साधक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.३.२०२१)
(समाप्त)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्य वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |