‘डेटिंग’ करणार्या गोव्यातील युवकांमध्ये भावनिक हिंसा ही सर्वसाधारण गोष्ट ! – अहवालातील निष्कर्ष
‘डेटिंग’द्वारे भिन्नलिंगी संबंध ठेवणार्या गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील हिंसेच्या गंभीरतेवर संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत केलेली कुठलीही गोष्ट भारतियांची सर्वच स्तरांवर अधोगती करणारीच ठरत आहे. त्यामुळे ‘डेटिंग’ काय ? किंवा विविध ‘डे’ काय ? हे सर्व युवा पिढीची हानी करणारेच आहे. यावर उपाय म्हणजे शिक्षणातून भारतीय सभ्यता आणि संस्कृती यांविषयीचे शिक्षण देणे हाच आहे !
पणजी, २९ मार्च (वार्ता.) – ‘डेटिंग’ करणार्या गोव्यातील युवकांमध्ये भावनिक हिंसा ही सर्वसाधारण गोष्ट झाली आहे, असा निष्कर्ष ‘इंटरनॅशनल सेंटर गोवा’ यांनी पुरस्कृत केलेल्या सर्वेक्षणाच्या अंतर्गत काढण्यात आला आहे. गोव्यातील ‘डेटिंग’ करणार्या युवकांशी निगडित हिंसेचे स्वरूप आणि गंभीरता या अनुषंगाने ‘संगथ’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणांतर्गत गोव्यातील ६ महाविद्यालयांतील १८ ते २२ वर्षे वयोगटातील विद्यार्थी, तसेच शिक्षकवर्ग यांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या गुणात्मक सर्वेक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.
या सर्वेक्षणातील महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. ‘डेटिंग’ करणार्या युवकांमध्ये लैंगिक हिंसा अल्प प्रमाणात आहे, तर भावनिक हिंसा हे सामायिकरित्या आढळणारे सूत्र आहे.
२. ‘डेटिंग’ करणार्या युवकांच्या जोडीदारांमध्ये दुसर्या जोडीदारावर स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करणे आणि यामुळे भावनिक हिंसा होणे, ही एक सामायिक आणि बहुतेक ठिकाणी आढळणारी गोष्ट आहे. जोडीदाराला विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी संवाद साधण्यास प्रतिबंध घालणे, सामाजिक माध्यमांतील अकाऊंटचे ‘पासवर्ड’ मागणे आणि ‘ऑनलाईन’ करत असलेल्या कृतींवर देखरेख ठेवणे आदी माध्यमांतून जोडीदारावर स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले जात आहे. विशेष म्हणजे ‘यावर उपाय काढला पाहिजे’, असे अनेकांना आता वाटत नाही.
३. काही घटनांमध्ये युवतीला तिच्या जोडीदार युवकाने त्याची लैंगिक वासना भागवणे आणि आर्थिक लाभ उठवणे यांसाठी बळजोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
४. ‘डेटिंग’ करणार्या काही युवतींच्या मते त्या लैंगिक हिसेंच्या बळी ठरल्यास लाज वाटत असल्याने त्या याविषयी कुणाकडेही तक्रार करत नाहीत.
५. वाढत्या वयामुळे ‘डेटिंग’च्या माध्यमातून संबंध ठेवणे, ही संकल्पना आता पालक आणि शिक्षक यांनी स्वीकारली पाहिजे. टीका करून किंवा त्यावर प्रतिबंध घालून ‘डेटिंग’ बंद होणार नाही. गोपनीयरित्या ‘डेटिंग’च्या माध्यमातून संबंध ठेवायला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि या संबंधांमध्ये काही घातक किंवा अप्रिय घडल्यास त्याला त्वरित आळा घातला पाहिजे, असे संशोधन करणार्या गटातील एका सदस्याने स्वत:चे मत व्यक्त करतांना म्हटले.
(‘डेटिंग’मुळे एवढी गंभीर समस्या युवा पिढीत निर्माण झालेली असतांना संशोधन करणार्या गटातील एका सदस्याला डेटिंगवर प्रतिबंध घालणे योग्य न वाटता ‘गोपनीयरित्या ‘डेटिंग’च्या माध्यमातून संबंध ठेवायला प्रोत्साहन दिले पाहिजे’, असे वाटणे हेच गंभीर आहे. इंग्रज गेले तरी त्यानंतरच्या ७३ वर्षांत भारतियांची पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे कशी हानी झाली, त्याचेच हे उदाहरण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची नितांत आवश्यकता आहे ! – संपादक)