परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !
फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी पू. जयराम जोशीआजोबा यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांची नात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऐश्वर्या हिने लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
२९ मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या (पू. जोशी आजोबांच्या) गुणवैशिष्ट्यांपैकी काही भाग पाहिला. आज पुढील भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहूया.
भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/463503.html
(भाग २)
१२. पू. आबांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव
१२ अ. ‘कृतज्ञता’ या गीताच्या ध्वनीचित्रफितीत प.पू. गुरुदेव आणि पू. आबांची भेट पहातांना पू. आबा ती पुष्कळ कृतज्ञतेने पहाणे : ‘रामनाथी आश्रमातून एखादा कार्यक्रम दाखवतात तेव्हा प्रत्येक वेळी आरंभी ‘कृतज्ञता’ या गीताची ध्वनीचित्रफित दाखवतात. त्यामध्ये परात्पर गुरुदेवांचे साधक आणि संत यांच्या समवेत झालेल्या भावक्षणांचे चित्रीकरण आहे. त्यात पू. आबा आणि परम पूज्य गुरुदेव यांच्या भेटीतील भावक्षणही आहेत. हे भावक्षण दाखवले जात असतांना पू. आबा ते पुष्कळ कृतज्ञतेने पहात असतात. त्या वेळी त्यांच्याकडे पाहिले की, ‘प्रत्यक्ष गुरुदेव आणि पू. आबांची भेट पहात आहोत’, असे वाटते. हे भावक्षण दाखवल्यावर पू. आबा नेहमी मला म्हणतात, ‘‘अगं, आपल्या संस्थेमध्ये कितीतरी साधक आणि संत आहेत की, ज्यांच्यात गुरुदेवांविषयी पुष्कळ भाव आहे. माझ्यात तेवढा भावही नाही, तरीही गुरुदेव नेहमी माझे त्यांच्या समवेतच्या भेटीतील चित्रीकरण दाखवतात. त्यांची आपल्या सगळ्यांवर किती कृपा आहे ! प्रत्येक वेळी आठवणीने सर्व दाखवतात. ही त्यांची आपल्यावरची कृपादृष्टी आहे.’’ पू. आबांचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे, तरीही ते म्हणतात, ‘माझ्यात भाव अल्प आहे.’ यातून ‘त्यांचा अहं किती अल्प आहे’, हे मला शिकायला मिळाले.
१२ आ. कार्यक्रम पहातांना ‘साक्षात् गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर पू. आबांची शारीरिक क्षमता नसतांनाही ‘त्यांच्या समोर कसे झोपायचे ?’, असा विचार करणे : एकदा कार्यक्रमाच्या पूर्वी सर्वांना ‘या कार्यक्रमाला साक्षात् गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवायला सांगितले होते. हा कार्यक्रम साधारण पाच घंट्यांचा होता. पू. आबांना एवढा वेळ बसणे शक्य होणार नाही; म्हणून त्यांच्यासाठी पलंगाची सोय करण्यात आली होती. तेव्हा पू. आबा मला म्हणाले, ‘‘साक्षात् परम पूज्य या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार, तर मी कसा झोपू ?’’ पू. आबांचा भाव एवढा होता की, परम पूज्य आपल्या समवेत आहेत’, हे ते अनुभवत होते.
१२ इ. पू. आबांनी प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर केलेल्या क्षमायाचनेतून आणि त्यांना वाटलेली खंत पाहून ‘क्षमायाचना कशी केली पाहिजे ?’, हे शिकायला मिळणे : आधी माझ्याकडून एखादी चूक झाली, तर माझ्या मनात ‘ही छोटी चूक आहे, तर मी या चुकीसाठी प्रायश्चित्त का घ्यायचे ?’, असा विचार असायचा; पण पू. आबा कोणत्याही चुकीकडे ‘छोटी किंवा मोठी चूक असे न पहाता तिच्याकडे ‘अपराध’ म्हणून पहातात आणि वारंवार त्यासाठी क्षमायाचना करतात. एकदा पू. आबांकडून प्रसाधनगृहातील दिवा चालू राहिला. त्यांच्या ते लक्षात आल्यावर पू. आबांनी गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर उभे राहून कान पकडून अत्यंत आर्ततेने क्षमायाचना केली. ते गुरुदेवांना म्हणाले, ‘हे गुरुदेवा, माझ्याकडून पुष्कळ मोठी चूक झाली. ‘मी प्रसाधनगृह वापरल्यावर दिवा बंद करायला विसरलो. हा माझा अपराध आहे. यामुळे गुरुधनाची हानी झाली आहे. गुरुदेव, मला क्षमा करा. यापुढे माझ्याकडून अशी चूक पुन्हा होणार नाही.’ त्यानंतरही प्रसाधनगृहातून आल्यावर प्रत्येक वेळी ते आधी घडलेल्या या चुकीसाठी क्षमायाचना करायचे. यातून मला ‘क्षमायाचना कशी केली पाहिजे ? आणि मनात किती खंत असली पाहिजे ?’, हे मला शिकायला मिळाले.
१२ ई. पू. आबांचा खोलीतील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या प्रती भाव : एकदा मी खोलीत गेल्यावर पू. आबांना म्हटले, ‘‘एवढा वेळ तुम्ही खोलीत एकटेच होतात ना ? मला क्षमा करा. मला यायला उशीर झाला.’’ तेव्हा पू. आबा मला म्हणाले, ‘‘अगं, मी एकटा कुठे होतो ? गुरुदेव माझ्या समवेतच बसले आहेत. ते सतत माझ्या समवेतच असतात. ते माझ्याशी बोलत असतात.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मला वाटले, ‘त्या छायाचित्राच्या रूपात गुरुदेव आपल्या खोलीत आहेत’, हा माझा भाव नसतो. त्यामुळे गुरुदेवांच्या छायाचित्राचा मी अपेक्षित असा लाभ करून घेत नाही. त्यानंतर मीसुद्धा ‘गुरुदेव सतत आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवण्यास आणि त्यांचे अस्तित्व अनुभवण्यासाठी प्रयत्न करण्यास आरंभ केला.
पू. आबांना ‘परम पूज्य आपल्या समवेत आहेत’, असा वेगळा भाव ठेवावा लागत नाही. त्यांच्यात सहजता असते, जसे एखादी व्यक्ती आपल्या समवेत असते आणि आपण तिच्याशी बोलतो, तितक्या सहजतेने ‘गुरुदेव समवेत आहेत आणि आपल्याशी बोलत आहेत’, असे पू. आबांना सतत जाणवते. यातून ‘भाव तेथे देव’ या उक्तीची प्रचीती येते.
१२ उ. लहान मूल आपल्या आईला सर्व सांगते, त्याप्रमाणे पू. आबा गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असणे, त्या वेळी ‘गुरुदेव आणि पू. आबा समोरासमोरच बसले आहेत’, असे जाणवणे : पू. आबा त्यांच्या खोलीतील परम पूज्य गुरुदेवांच्या छायाचित्राशी सतत बोलत असतात. पू. आबा दिवसभरात घडणार्या सर्व घडामोडी त्यांना सांगतात. ‘एखादे लहान मूल जसे सगळ्या गोष्टी आईला सांगते, तसेच पू. आबा गुरुदेवांना सांगतात. पू. आबा गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर आत्मनिवेदन करतांना हात जोडून आणि वाकून गुरुदेवांना सर्व सांगतात.
१२ ऊ. कार्यक्रमासाठी प्रार्थना केल्यानंतर कुणी कार्यक्रम चांगला झाल्याचे म्हणाल्यास पू. आबांनी त्याचे श्रेय गुरुदेवांना देण्यास सांगणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काही कार्यक्रमांचे आयोजन केले की, त्यातील येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी साधक पू. आबांना प्रार्थना करायला सांगतात. तेव्हा पू. आबा गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर बसून प्रार्थना करतात, ‘हे गुरुदेवा, आज आपल्या समितीचा मोठा कार्यक्रम आहे. त्याला अनेक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमात अनिष्ट शक्तींमुळे येणारे सर्व अडथळे तुम्हीच दूर करणार आहात. हा कार्यक्रम सुरळीत पार पाडून आणि त्याचा अपेक्षित असा लाभ सर्वांना तुम्हीच करून देणार आहात.’ कार्यक्रम झाल्यावर साधक पू. आबांना ‘कार्यक्रम अगदी छान झाला’, असे सांगतात. तेव्हा पू. आबा म्हणतात, ‘‘माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करू नका. मी काहीच केले नाही. मला गुरुदेवांनी केवळ माध्यम बनवले आहे. कर्ता-करविता तेच आहेत. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा.’’
१२ ए. ‘गुरुदेवांनी दिलेल्या सेवेमध्ये आपण स्वतःचा विचार न करता सेवा झोकून देऊन केली पाहिजे’, असा विचार करून साधकांना साहाय्य करणे : पू. आबांशी बोलतांना ‘परम पूज्य गुरुदेवांशी बोलत आहोत’, अशी अनुभूती साधकांना नेहमी येते. साधकांना साधनेविषयी काही अडचण आली की, ते पू. आबांकडे येतात. त्या वेळी पू. आबा त्यांना ‘आता माझी विश्रांतीची वेळ आहे किंवा माझी जेवणाची वेळ आहे’, असे कधीही सांगत नाहीत. साधक कधीही आले, तरी पू. आबा त्यांना भेटतात. बर्याच वेळा काही साधकांचे रात्री उशिरा भ्रमणभाष येतात. तेव्हा पू. आबा विश्रांती घेत असले, तरीही ते साधकांशी भ्रमणभाषवर बोलून त्यांची अडचण समजून घेतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात. एकदा मी त्यांना ‘तुम्ही असं का करता?’, असे विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘अगं, गुरुदेवांनी मला हे दायित्व दिले आहे. त्यांनी एवढ्या विश्वासाने माझ्यावर ही सेवा सोपवली आहे. मी माझा विचार केला, तर ती सेवा परिपूर्ण कशी होणार ? मी माझ्या कृतींना प्राधान्य दिले किंवा माझ्या वेळेनुसार साधकांना भेटलो, तर ते गुरुदेवांना आवडेल का ? ती खरी सेवा होणार नाही. गुरुदेवांनी दिलेल्या सेवेमध्ये आपण स्वतःचा विचार न करता सेवा झोकून देऊन केली पाहिजे.’’
१२ ऐ. ‘आपल्याकडे जे काही आहे’, ते परात्पर गुरुदेवांनी दिले आहे’, असे पू. आबांनी सांगणे : पू. आबा ‘कोणतीही वस्तू माझी आहे’, असे कधीही म्हणत नाहीत. ‘आपल्याकडे जे काही आहे’, ते परात्पर गुरुदेवांनी दिले आहे’, असे ते सांगतात. सध्या समाजातील लोकांची किती कठीण स्थिती आहे; पण गुरुदेवांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे’, असा त्यांचा भाव असतो.
१२ ओ. ‘परात्पर गुरुदेव सर्वकाही करत असून आपण त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवावी’, असे पू. आबांनी सांगणे : पू. आबा नेहमी मला सांगतात, ‘‘गुरुदेवांवर श्रद्धा ठेव. ते सर्वकाही करून घेतात. केवळ आपली त्यांच्यावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. आपण गुरुदेवांकडे काही मागायचे नाही आणि अपेक्षाही करायची नाही. केवळ ‘हे गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित असेल, ते तुम्ही करून घ्या’, अशी त्यांना प्रार्थना करायची.
– कु. ऐश्वर्या योगेश जोशी (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (११.३.२०२१)
(क्रमश:)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुकपू. आबांमध्ये अजिबात अहं नाही ! – परात्पर गुरु डॉ. आठवलेपरात्पर गुरुदेव आणि पू. आबांची भेट झाल्यावर परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘पू. आबांच्या अंगठ्याकडे बघा, तो किती वाकलेला आहे !’’ गुरुदेवांनी सर्व साधकांनाही त्यांचा अंगठा पहायला सांगितले. तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘पू. आबांमध्ये इतकी नम्रता आहे की, त्यांचा अंगठाही इतका झुकतो. त्यांच्यामध्ये अजिबात अहं नाही.’’ गुरुदेवांच्या या वाक्याची प्रचीती आम्हाला नेहमी येते. पू. आबांच्या कोणत्याच कृतीमध्ये कधीच अहंचा लवलेशसुद्धा दिसत नाही. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |