पुणे येथील तुकाराम बीज सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच मंदिरात उपस्थित रहाण्याची अनुमती
पुणे, २९ मार्च – या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २८ मार्च या दिवशी दिली. शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून अनुमाने २५० वारकर्यांनी देहूच्या वेशीवर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह भजन आंदोलन केले. कोविड-१९ प्रकरणांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता २८ मार्च या दिवशी पहाटेपासून ३० मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले की, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नेते ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी नुकतेच सामाजिक माध्यमावर आणि मुलाखतीत भाविकांना देहू येथे येण्यास आवाहन केले आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. वारकरी मोठ्या संख्येने देहू येथे आले, तर त्यांच्यामुळे कोविडचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त वारकरी संप्रदायाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत आणि भक्त मोठ्या संख्येने येथे जमा झाल्यास होणार्या गंभीर परिणामांविषयी सांगत आहेत.