समष्टीच्या आनंदाने आनंदी होणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती मनात अपार भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अपाला औंधकर ही एक आहे !
रत्नागिरी येथील बालसाधिका कु. अपाला औंधकर हिचा फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया, ३०.३.२०२१ या दिवशी वाढदिवस आहे. कु. अपाला औंधकर भरतनाट्यम् नृत्य शिकते. सध्या ती रामनाथी आश्रमात राहून ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या भावाने नृत्य शिकत आहे आणि साधनाही करत आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात संगीत विभागात साधना करणार्या साधिकांना जाणवलेली तिची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
कु. अपाला औंधकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणे
‘अपाला आश्रमात आली, तेव्हापासून ती नेहमी आनंदी, हसरी आणि उत्साही असते. ती छोट्या प्रसंगातूनही आनंद घेते आणि तो प्रसंग इतरांना सांगून त्यांनाही आनंद देते. तिला कुठलीही नवीन अनुभूती आली की, ती लगेच इतरांना अनुभूती सांगून त्यांनाही आनंद देते. अपाला अनुभूती सांगतांना ‘आम्हीच ती अनुभूती घेत आहोत’, असे आम्हाला जाणवायचे.’
– संगीत सेवेतील सर्व साधिका
२. अभ्यासू
‘नृत्यातील ‘कुठली मुद्रा केल्यावर काय जाणवते ?’ किंवा ‘एकच मुद्रा अनेक स्थितीत ठेवल्यावर काय जाणवते ?’, याचा अपाला अभ्यास करायची. ‘हा अभ्यास पूर्ण झाला’, असे वाटेपर्यंत ती अभ्यास करायची. ती मुद्रांचा केलेला अभ्यास पडताळण्यासाठी तत्परतेने देते. तिचे या अभ्यासाविषयी केलेले लिखाण व्यवस्थित आणि पूर्ण असायचे.’
– सौ. अनुपमा कानस्कर, कु. म्रिणालिनी देवघरे आणि होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी
३. अभ्यासाचे गांभीर्य
‘अपाला आश्रमात असतांना तिच्या नियोजनात ‘शाळेचा अभ्यास करणे’ हेही असायचे. ती अभ्यासाकडेही गांभीर्याने लक्ष द्यायची. त्यातून मला ‘तिच्यात साधनेप्रती चिकाटी आणि गांभीर्य आहे, तेवढेच अभ्यासाप्रतीही आहे’, हे लक्षात आले.’
– कु. शर्वरी कानस्कर
४. शिकण्याची वृत्ती
४ अ. पोळ्या करायला शिकायची इच्छा दर्शवणे आणि तसा प्रयत्नही करणे : ‘एकदा मला माझ्या बाबांसाठी (श्री. हेमंत कानस्कर) जेवण बनवून त्यांचा डबा भरायची सेवा मिळाली होती. तेव्हा शर्वरी आणि अपाला माझ्या साहाय्यासाठी होत्या. मी पोळ्या लाटत असतांना अपाला ‘मी पोळी कशी लाटत आहे’, हे एकाग्रतेने पहात होती; म्हणून मी तिला विचारले, ‘‘मी तुला पोळ्या लाटायला शिकवू का ?’’ तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला आणि ती लगेच मला म्हणाली, ‘‘हो ताई, शिकव ना मला. मग मी घरी आईलाही बनवून देईन.’’ मी तिला पोळी लाटण्याविषयी सांगतांना ती माझे बोलणे एकाग्रताने ऐकत होती आणि तसे करण्याचे प्रयत्न करत होती.’
– कु. अंजली कानस्कर
४ आ. चुकांमध्ये न अडकता शिकणे : ‘अपाला आश्रमात रहायला आल्यावर तिच्याकडून काही गंभीर चुका झाल्या होत्या. तेव्हा तिला त्याची जाणीवही करून दिली गेली होती; मात्र ती निराश झाली नाही. त्यातून ती शिकली.’
– संगीत सेवेतील सर्व साधक
५. स्वीकारण्याची वृत्ती
‘अपालाला संगीत सेवेत किंवा कुणीही एखाद्या गोष्टीविषयी काही पालट करायला सांगितला, तर ती ते स्वीकारून लगेच कृतीत आणते.
– कु. म्रिणालिनी देवघरे
६. सकारात्मकता
६ अ. ‘स्वतःला अंतिम फेरीत पोचता आले नाही’, याविषयी वाईट न वाटता, श्री गुरूंचे कार्य सगळ्यांना कळले आणि सहसाधिकांना पुरस्कार मिळाले’, हा समष्टी आनंद सहजतेने घेऊ शकणारी अपाला ! : ‘सुर ताल हुनर का कमाल’ या आंतरराष्ट्र्रीय नृत्यस्पर्धेत ती उपांत्य फेरीपर्यंत पोेचली. ‘ती अंतिम फेरीत पोेचली नाही’, याचे तिला अजिबात वाईट वाटले नाही. मी तिला म्हणाले, ‘‘मला तुझे फार कौतुक वाटते. अंतिम फेरीत निवड झाली नाही, तरी तू स्थिर आहेस. तुला वाईट वाटले नाही का ?’’ ती मला म्हणाली, ‘‘नाही गं ताई, आम्ही केवळ एक माध्यम आहोत. खरेतर ही स्पर्धा ‘गुरुदेवांचे कार्य जगाला समजावे’, यासाठी होती. आम्हाला पारितोषिक मिळो किंवा न मिळो, ‘श्री गुरूंचे कार्य जगाला कळले’, याचाच मला फार आनंद झाला. ‘प्रियांकाताई (कु. प्रियांका लोटलीकर) आणि तेजलताईला (कु. तेजल पात्रीकर) ‘नारीशक्ती’ पुरस्कार मिळाला’, याचाही मला फार आनंद झाला. हे सर्व आपले यशच आहे ना ?’’ तिचे हे प्रगल्भ उत्तर ऐकून मला तिचे फार कौतुक वाटले.’
– कु. म्रिणालिनी देवघरे
(क्रमशः उद्याच्या अंकात)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |