वाराणसी येथील भरत मिलाप मैदानाच्या कडेला लावण्यात आलेल्या रामचरितमानसमधील ओव्यांच्या फलकांच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य ! – हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाराणसी – येथील नाटीईमली भागातील भरत मिलाप मैदानाच्या कडेला पवित्र रामचरित्रमानसमधील ओव्यांचे फलक आहेत. हे फलक रस्त्याच्या बाजूने असल्यामुळे त्यावर प्राण्यांचे मलमूत्र, रस्त्यावरील धूळ आणि घाण सतत उडत असते. त्यामुळे हे फलक तेथून हटवून दुसर्या पवित्र ठिकाणी लावण्यात यावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषदेचे महासचिव अधिवक्ता अरूण कुमार मौर्य, अधिवक्ता विकास सेठ, राहुल सिंह, शशिकांत मालवीय, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी आणि श्री. राजन केशरी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्या मैदानामध्ये प्रसिद्ध भरत मिलाप आणि रामलीला यांचे आयोजन करण्यात येते, त्याच ठिकाणी प्रभु श्रीरामचंद्रांच्या ओव्यांच्या फलकांचा घोर अवमान होत आहे. संपूर्ण वर्षभरात या ठिकाणी ६ – ७ वेळा व्यापारी मेळ्याचे आयोजन करण्यात येते. त्या वेळी लोकांची मोठी गर्दी जमत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घाण होते. ते पाहून परिसरातील हिंदूंच्या धार्मिक भावना प्रतिदिन दुखावल्या जातात. पवित्र रामचरितमानस आमचा ‘सांस्कृतिक वारसा’ आहे. ते आम्हाला जीवनात योग्य मार्गाने चालण्यासाठी दिशादर्शन करते, तसेच धर्माचरण करण्याची प्रेरणा देते.