पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढ; वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण !
कोल्हापूर, २९ मार्च (वार्ता.) – गेल्या आठवड्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. बहुतांश तिन्ही जिल्ह्यांमध्ये पारा ३८ अंश पार झालेला आहे. कडक उन्हामुळे दुपारी अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्या महाबळेश्वरचा पाराही ३२ अंशांवर गेला आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले असून थंडावा देणार्या पदार्थांकडे नागरिक जात आहेत. फळांच्या रसासमवेत उसाचा रस, ताक, लस्सी अशा थंडपेयांनाही मागणी वाढत आहे.
सोलापूर येथील तापमान ४० अंशांवर पोचले
सोलापूर – येथे मागील ३ दिवसांपासून तापमानात वाढ होत असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. यंदाच्या वर्षी २७ मार्च या दिवशी सर्वाधिक ४०.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मागील सप्ताहात अवकाळी पाऊस पडल्याने तापमान ३५.९ पर्यंत आले होते, तर किमान तापमान २०.३ अंशापर्यंत होते. केवळ ३ दिवसांत ४.७ अंशांनी तापमानात वाढ झाली आहे.