मिठी नदीमध्ये संगणक, सीपीयू, २ नंबर प्लेट, २ डी.व्ही.आर्., प्रिंटर, तसेच अन्य महत्त्वाचे पुरावे सापडले

मनसुख हिरेन हत्या प्रकरण

पोलिसांना मिठी नदीतून महत्त्वाचे पुरावे सापडले

मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने २८ मार्च या दिवशी मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी मुंबई पोलीस विभागातील निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील मिठी नदीच्या पुलावर नेले.

अन्वेषण यंत्रणेचे म्हणणे होते की, सचिन वाझे यांनी या नदीत हार्ड डिस्क फेकली होती. त्यामुळे नदीच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांना १२ पाणबुड्यांच्या साहाय्याने नदीत शोध घेतल्यावर तेथून संगणक, सीपीयू, वाहनांच्या २ नंबर प्लेट, २ डी.व्ही.आर्., प्रिंटर, तसेच इतर महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. वाझे हे ३ एप्रिलपर्यंत एन्.आय.ए.च्या कोठडीत आहेत. एन्.आय.ए.च्या अधिवक्त्यांनी सांगितले की, वाझेंच्या घरातून ६२ काडतुसे जप्त करण्यात आली; मात्र ती घरी कशी आली ? याचे उत्तर वाझे यांच्याकडून मिळाले नाही. तसेच सरकारी कोट्यातून वाझे यांना देण्यात आलेल्या ३० पैकी २५ काडतुसे गहाळ आहेत. याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही.