छत्रपती शिवाजी महाराजांच्या कळंगुट येथील मिरवणुकीला विरोध नसून मी शिवप्रेमींच्या समवेत आहे ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री
काही लोक आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप
म्हापसा, २८ मार्च (वार्ता.) – कळंगुट येथील शिवप्रेमींनी ३१ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या (तिथीनुसार) निमित्ताने मिरवणूक काढणार असल्याचे घोषित केले आहे. या मिरवणुकीला माझा विरोध असल्याचे भासवले जात आहे; मात्र मी शिवप्रेमींच्या समवेत आहे. राज्यात सर्वजण सर्मधर्मसमभावानुसार एकत्रित रहातात; मात्र अवघे काही जण त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत, असा आरोप बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी केला आहे.
कळंगुट येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीला (दिनांकानुसार) मिरवणूक काढण्यास मंत्री मायकल लोबो यांनी विरोध केल्याने शासनाने मिरवणुकीला अनुमती देण्यास विरोध केल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी ३१ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने म्हापसा-कळंगुट या मार्गाने भव्य मिरवणूक काढणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मायकल लोबो यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘कळंगुट येथे सर्व धर्मांचे लोक नाताळ, वाढदिवस, गणेशचतुर्थी आदी सार्वजनिक उत्सव एकत्रितपणे साजरे करतात; मात्र एक व्यक्ती आमच्यामध्ये दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही आमची परंपरा आहे. चांगल्या गोष्टीसाठी माझा सदैव पाठिंबा आहे. यापूर्वी कळंगुट येथे श्री बाबरेश्वर मंदिराजवळील स्मशानभूमीला विरोध झाला होता आणि या प्रकरणाचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला होता. माझा श्री बाबरेश्वर मंदिर समितीला सदैव पाठिंबा आहे.’’