मुंबईत कोरोना लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार !
महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये ७० टक्के लसीकरण
मुंबई – मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचार्यांसाठीचे कोरोना लसीकरण चालू झाले. १ मार्चपासून तिसर्या टप्प्यातील लसीकरण चालू झाले. या अंतर्गत आज लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला असून आजपर्यंत एकूण १० लाख ८ सहस्र ३२३ इतके लसीकरण करण्यात आले आहे. यांपैकी ७ लाख ७ सहस्र ४७४ (७०.१६ टक्के) लसीकरण हे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर करण्यात आले आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
लसीकरण करण्यात आलेल्या एकूण व्यक्तींपैकी ४७.३६ टक्के संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १०६ लसीकरण केंद्रे कार्यरत असून यांपैकी २८ महापालिकेच्या अखत्यारितील आहेत. सर्व केंद्रांवर केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमितपणे लसीकरण करण्यात येत आहे, तसेच महानगरपालिका, राज्य आणि केंद्र शासन यांच्या अखत्यारितील लसीकरण केंद्रांवर विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. तर खासगी लसीकरण केंद्रांवर प्रतिमात्रा २५० रुपये शुल्क आकारले जात आहे.