शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या विक्रीचे नियोजन करावे, या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकार्यांना निवेदन
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची जिल्हाधिकार्यांकडून प्रशंसा !
रायगड, २८ मार्च (वार्ता.) – गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या वतीने गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम राबवली जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होऊ नये, यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये समाजसेवी संस्थांच्या सहाय्याने श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी केंद्रेही उभारली जातात. रायगड जिल्ह्यातही हिंदूंना त्यांच्या प्रथा-परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी आपणही मूर्तीकारांना आवाहन करून शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या मूर्तीचे महत्त्व सांगून अशा मूर्ती विक्रीसाठी येतील, याचे नियोजन करावे, अशी मागणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. देवतांचे विडंबन होण्यापासून थांबवले पाहिजे. ‘एक गाव एक गणपति’, ‘एक गल्ली एक गणपति’ अशा संकल्पना राबवल्या पाहिजेत’, असे मत जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केले. या वेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर, श्री. सुनील कदम, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता उमेश आठवले, अधिवक्ता परिषदेचे कोषाध्यक्ष अधिवक्ता श्री. श्रीराम ठोसर, अधिवक्ता नीलेश म्हात्रे, तसेच धर्मप्रेमी श्री. मनेक पटेल हे उपस्थित होते.