कराड शहरात ३४ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) !
कराड, २८ मार्च (वार्ता.) – शहरात गत ५ ते ६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कराड शहर परिसरात ३४ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) निर्माण करण्यात आले आहेत.
कराड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नगरपालिका आणि नागरी आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. गतवर्षी कराड कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरले होते; मात्र सर्व यंत्रणांच्या वतीने कोरोना आटोक्यात आणण्यात यश प्राप्त झाले होते. आता गत काही दिवसांपासून पुन्हा कराड तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. सर्व विभागांमध्ये सर्वेक्षणाचे कार्य वेगाने चालू असून दुसर्या बाजूला नागरी आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरणही चालू आहे. तसेच नगरपालिकेच्या वतीने जनजागृतीही करण्यात येत आहे.