समंजस आणि प्रगल्भ बुद्धीमत्ता असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे ही एक आहे !
‘देवद आश्रमातील बालसाधिका चि. ऋग्वेदी गोडसे हिच्याविषयी आश्रमातील साधकांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
सौ. ममता महेंद्र राठोड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. खाण्यापिण्याची आवड नसणे
‘चि. ऋग्वेदीची खाण्या-पिण्याची वेगळी आवड नाही. आश्रमात सर्वांसाठी जे अन्न बनवले जाते, तेच ती जेवते.
२. हट्टीपणा उणावणे
तिचे बाबा तिच्यासाठी पुष्कळ नवीन कपडे घेतात. ती घरी रहात असतांना प्रतिदिन वेगळे कपडे घालण्याकडे तिचा कल होता; परंतु आश्रमात रहायला आल्यापासून तिचा हा हट्ट न्यून झाला आहे.
३. समंजस
ऋग्वेदी बालसाधिका कु. दिव्या जोशी हिच्या समवेत खेळते. दिव्याला कधीकधी त्रास होत असतांना ती ऋग्वेदीवर चिडचिड करते आणि तिला रागावते. प्रसंगी एखादा फटकाही मारते, तरीही ऋग्वेदीने कधीही दिव्याला मारले नाही कि तिच्यावर रागावली नाही. दिव्याने केलेल्या अयोग्य कृती ती दिव्याच्या आईला सांगते आणि दिव्या शांत झाल्यावर तिलाही समजावते.
४. प्रगल्भ बुद्धीमत्ता
‘ऋग्वेदीच्या बुद्धीची प्रगल्भता आश्रमात रहायला आल्यावर पुष्कळ वाढली आहे’, असे लक्षात येते. ती सेवेला आरंभ करण्यापूर्वी ‘सेवा कशी करायची ?’, हे समजून घेते. तिला समजले नाही, तर पुनःपुन्हा प्रश्न विचारते. धान्य निवडण्याची सेवा करतांना ती मला विचारते, ‘‘मावशी, हे धान्य निवडतांना यातून वेगळे काय काढायचे ?’’ ती तिला सांगितल्याप्रमाणे अचूक खडे वेचून काढते आणि अन्य कचरा बाजूला करते.
५. आश्रमात रहायला येण्याची तीव्र तळमळ
ऋग्वेदी आश्रमात रहायला येण्यापूर्वी तिने तिच्या आईला विचारले, ‘‘आपण आश्रमात कधी रहायला जायचे ?’’ तेव्हा तिची आई तिला म्हणाली, ‘‘पू. (सौ.) आश्विनीताईंना विचारावे लागेल.’’ आईने असे सांगितल्यावर तिने क्षणाचाही विलंब न करता पू. (सौ.) आश्विनीताईंना विचारले, ‘‘आम्ही आश्रमात कधी रहायला येऊ ?’’ पू. आश्विनीताईंनी तिला ‘मी तुला नंतर सांगते’, असे सांगितल्यावर तिने त्यांना पुनःपुन्हा विचारून पाठपुरावाही घेतला. ती आश्रमात रहायला आल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला.’ (डिसेंबर २०२०)
सौ. सुप्रिया आठवले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. वेळेचे गांभीर्य
एकदा आम्ही धान्य निवडण्याची सेवा करत होतो. त्या वेळी ऋग्वेदीने बाहेरील झाडावर एका पक्ष्याचे घरटे पाहिले. ती ते आम्हा साधिकांना बघण्यास सांगत होती; परंतु नंतर ती एका क्षणात म्हणाली, ‘‘पण ही सेवेची वेळ आहे ना ! सेवा सोडून नको जायला. तुम्ही चहा घ्यायला जाल, त्या वेळी बघू शकता.’’
२. साधकांचा विचार करणे
मला बरे नसल्याने मी सायंकाळी धान्य निवडण्याची सेवा करत असे आणि सायंकाळी ६.३० वाजता स्वयंपाकघरातील साधकांच्या समवेत सामूहिक मंत्र म्हणण्यासाठी जात असे. एक दिवस मी मंत्र म्हणण्यासाठी जात असतांना ती मला म्हणाली, ‘‘आजी, तुम्ही इथेच मंत्र म्हणा, म्हणजे इथल्या साधकांचाही मंत्र म्हणून होईल.’’
३. ‘आश्रम म्हणजे एक शाळाच आहे’, असे सहजतेने आणि धडाडीने सांगणे
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मी तिला शाळेविषयी गमतीने विचारत होते. तेव्हा आमच्यात पुढीलप्रमाणे संभाषण झाले.
मी : आता शाळा चालू झाल्यावर शाळेत जाणार ना ?
चि. ऋग्वेदी : मी आश्रमातच शाळा शिकणार.
मी : इथे काय शिकणार ?
चि. ऋग्वेदी : नामजप आणि प्रार्थना कशी करायची ? स्वभावदोष आणि अहं कसेे घालवायचे ?
मी : अहं म्हणजे काय ?
चि. ऋग्वेदी : अहं म्हणजे गर्व !
तिचे बोलणे ऐकून आम्ही सर्व साधिका तिच्याकडे पहातच बसलो. तेव्हा तिने आम्हाला भीमाचे गर्वहरण झाल्याची गोष्ट सांगितली. अशा अनेक प्रसंगात ऋग्वेदीची प्रगल्भता मला अनुभवायला मिळाली. ‘गुरुमाऊली लहान बालकांना कसे घडवत आहे !’, हे पाहून मला गुरुमाऊलींप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत होतो.
४. ऋग्वेदीमध्ये ‘गोड बोलून साधकांना आपलेसे करणे, निर्भयता, सहजता, सेवेचे महत्त्व, इतरांचा विचार करणे’ अशा अनेक गुणांचा समुच्चय आहे.
५. ‘ऋग्वेदीची प्रगल्भता पाहून तिची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांच्या पुढेच असणार’, असे मला वाटले. (प्रत्यक्षातही चि. ऋग्वेदीची तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली.’ – संकलक) (३.१२.२०२०)
श्री. विलास महाडिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
चि. ऋग्वेदी गोडसे हिच्या नावाचा साधकाला सुचलेला भावार्थ !
ऋ : ऋतुराज वसंतात गाणार्या कोकीळेप्रमाणे देवद आश्रमात वसंत आणणारी
ग् : गंमत-जंमत करतांनाही अध्यात्माविषयी बोलणारी
वे : वेणूनादाप्रमाणे मधुर आवाज असणारी
दी : दिव्याशी (टीप) घट्ट मैत्री ठेवणारी
गो : गोड बोलून लहान-थोरांशी मैत्री करणारी
ड : डफलीप्रमाणे बडबड करणारी
से : सेवेत रमणारी आणि तत्परतेने सेवा करणारी
टीप : बालसाधिका चि. दिव्या पुष्कराज जोशी (२२.१२.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |