परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !
पू. जयराम जोशीआजोबा यांचा फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांची नात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ऐश्वर्या हिने लिहिलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(भाग १)
१. मुलगा आणि सून परगावी असतांना नातीची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेणे
मी दुसरीत असतांना मिरज आश्रमात आले. त्या वेळी माझ्या समवेत आई-बाबा नव्हते. ते दोघे रामनाथी आश्रमात होते आणि मी अन् पू. आबा मिरज आश्रमात होतो. तेव्हाही ते त्यांना ‘मिरजेला या’, असे कधीच म्हणाले नाहीत. तेव्हा पू. आबा माझे आई आणि बाबा बनले. ते माझी इतकी काळजी घ्यायचे की, मला आई-बाबांची कधी आठवण आली नाही. ‘आ – आई आणि बा – बाबा’ म्हणजे माझे ‘आबा.’ माझे कपडे धुणे, पुस्तकांना ‘कव्हर’ घालणे इत्यादी सगळ्या गोष्टी पू. आबा करायचे. ते प्रतिदिन सकाळी माझे आवरून मला शाळेत सोडायला यायचे.
२. प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करणे आणि इतरांच्या अडचणी समजून घेणे
मिरज आश्रमात आल्यावर आरंभी पू. आबा स्वागतकक्षात सेवा करायचे. स्वागतकक्षात येणार्या प्रत्येक व्यक्तीची ते आपुलकीने चौकशी करायचे. रात्री त्यांना स्वागतकक्षातून सोडण्यासाठी साधक वेळेत आला नाही, तरी ते गार्हाणे करायचे नाहीत. ‘त्या साधकाला काहीतरी अडचण असेल; म्हणून उशीर झाला असेल’, असे ते समजून घ्यायचे.
३. वयाने मोठे असूनही साधकांना सेवा सांगतांना नम्रतेने आणि निरपेक्षपणे सांगणे
मिरज आश्रमात पू. आबा सगळ्यांपेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांना जास्त अनुभव आहे; पण कोणतीही सेवा करतांना ते साधकांना ‘हे असेच करा किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे करा’, असे सांगत नाही. ‘कशा पद्धतीने सेवा केली, तर ती अल्प व्ययात आणि परिपूर्ण होईल ? ज्यामुळे गुरूंच्या धनाचा अपव्यय होणार नाही’, असे पू. आबा सुचवतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘साधकांनी कृती केली पाहिजे’, अशी ते अपेक्षा करत नाहीत.
४. पू. आबांना कुणी काही सांगितले, तर ते लगेच स्वीकारतात आणि लगेच त्याप्रमाणे कृती करतात.
५. पू. आबांनी समजावून सांगितलेलाच प्रश्न परीक्षेत येणे आणि त्या उत्तराला पूर्ण गुण मिळणे
एकदा माझी इंग्रजीची परीक्षा होती; म्हणून मी अभ्यास करत होते. परीक्षेला जाण्याअगोदर माझे कल्पनाविस्ताराचे पुस्तक वाचायचे राहिले होते. ‘आता जेवढी होतील, तेवढी पाने वाचूया’, असे ठरवून मी वाचू लागले. त्या वेळी पू. आबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि मला म्हणाले, ‘‘Practice makes a man perfect’’ म्हणजे ‘सराव माणसाला परिपूर्ण बनवतो.’ योगायोग म्हणजे मी तोच कल्पनाविस्ताराचा विषय वाचत होते. मी पू. आबांना म्हटले, ‘‘आबा, तुम्ही आता म्हटलेलेच मी वाचत आहे. मला त्याचा अर्थ आणि कोणती उदाहरणे लिहिली की, तो विषय चांगला होईल, तेही सांगा.’’ तेव्हा पू. आबांनी मला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. ‘सराव मनुष्याला कसा परिपूर्ण बनवतो ?’, याविषयी ते मला माझ्या आयुष्यातील उदाहरणे देऊन सांगत होते. वेळ झाल्यावर मी पू. आबांना म्हटले, ‘‘आबा, आता निघायची वेळ झाली आणि माझे काही वाचूनसुद्धा झाले नाही. मी आता काय करू ?’’ तेव्हा पू. आबा मला म्हणाले, ‘‘तू काळजी कशाला करतेस ? जे येईल, ते श्रीकृष्णाला प्रार्थना करून लिही. पुढच्या वेळी आधीच उजळणी कर.’’ परीक्षेला गेल्यावर पू. आबांनी सांगितलेलाच प्रश्न आला होता. त्यामुळे मला त्याचे उत्तर लिहिता आले. मी लिहिलेल्या त्या उत्तराला शिक्षकांनी पैकीच्या पैकी गुण दिले. प्रत्यक्षात कल्पनाविस्ताराच्या उत्तराला पैकीच्या पैकी गुण दिले जात नाहीत.
६. पू. आबांनी अभ्यास करण्यापूर्वी नामजपादी उपाय करण्यास आणि श्रीकृष्णाला शरण जाण्यास सांगणे आणि त्याप्रमाणे केल्यावर परीक्षेला अभ्यास केलेले प्रश्न येऊन त्यांची उत्तरे लिहिता येणे, अशी अनुभूती अनेकदा येणे
माझी शालांत परीक्षा होती. त्या आधी सराव परीक्षा होत्या. तेव्हा माझी प्रकृती बरी नव्हती आणि अभ्यासही पुष्कळ होता. आता ‘सर्व उजळणी कशी पूर्ण होणार ?’, याचा मला ताण आला होता. ‘नेमका कोणता भाग वाचू ?’, असे माझ्या लक्षात येत नव्हते आणि सर्व वाचायला वेळही नव्हता. तेव्हा मला पू. आबांनी सर्व नामजपादी उपाय करून मग अभ्यासाला आरंभ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे केल्यावर मला बरे वाटू लागले आणि मला आकलन होऊ लागले. त्या वेळी पू. आबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला अन् मला आलेली सगळी मरगळ निघून गेली. मला हलके वाटले आणि अभ्यास करायला उत्साह आला. पू. आबांनी मला विभूती लावली आणि ते म्हणाले, ‘‘देवाला पूर्ण शरण जा. ‘देवा, मला काहीच येत नाही. तूच मला सुचव. तुला अपेक्षित असे माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी प्रार्थना कर.’’ अशी प्रार्थना केल्यावर ‘कोणता भाग वाचू ? हे मला कृष्ण सुचवत आहे’, असे मला जाणवू लागले. त्याप्रमाणे केल्यावर माझी उजळणी लवकर झाली आणि मनावरचा ताणही निघून गेला. पू. आबांमुळे मी त्या स्थितीतून बाहेर येऊ शकले; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. श्रीकृष्णाने मला जो अभ्यास करण्यास सुचवले होते, तेच दुसर्या दिवशी परीक्षेतही आले होते’, अशा प्रकारची अनुभूती देवाने मला अनेक वेळा दिली आहे.
७. प्रतिदिन अंघोळ झाल्यावर उपायांच्या देवतांची चित्रांची शुद्धी करून ती भावपूर्ण लावणे, त्या माध्यमातून ‘देवता आपले रक्षण आहेत’, असा भाव असणे
प्रतिदिन अंघोळ केल्यावर पू. आबा उपायांसाठी लावायच्या देवतांच्या चित्रांना उदबत्तीने धूपवून त्यांची शुद्धी करतात. त्या चित्रांना अतिशय कृतज्ञताभावाने डोके टेकवून नमस्कार करतात आणि त्यानंतर ती चित्रे शरिरावर लावतात. असा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. त्यांच्या या दिनक्रमात कधीही खंड पडत नाही. पू. आबा मला प्रत्येक वेळी सांगतात, ‘‘ही केवळ चित्रे नसून त्या देवता आहेत आणि त्या देवतांचे तत्त्व कार्यरत असून त्या आपले रक्षण करतात.’’ पू. आबा उपायांची चित्रे लावायला कधीही विसरत नाहीत.
८. प्रत्येक साधकाशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेमाने वागणे
पू. आबांच्या खोलीत कुणीही साधक आला, तर त्याला ते कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. त्याला ते खाऊ देऊनच पाठवतात. त्यांना प्रत्येक साधकाविषयी पुष्कळ प्रेम आहे. पू. आबा प्रत्येक साधकाशी ‘तो कुटुंबातील एक सदस्य आहे’, अशा प्रकारे वागतात.
९. इतरांचा विचार करणे
पू. आबा नेहमी स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. इतरांना काही त्रास होऊ नये, याची काळजी घेतात. पू. आबांची प्रकृती बरी नसल्यावर ते कधीही ‘माझ्यासाठी काही करा’, असे सांगत नाही. त्यांना रात्री प्रसाधनगृहात जायचे असेल, तर ते साहाय्यासाठी इतरांना उठवत नाहीत. ‘माझ्यामुळे दुसर्यांची झोपमोड व्हायला नको. सर्वजण दिवसभर सेवा करून दमलेले असतात.’ त्यांना रात्री विश्रांतीची आवश्यकता असते. मी त्यांना वारंवार उठवले, तर त्यांची विश्रांती होणार नाही आणि दुसर्या दिवशी त्यांच्या सेवेवर परिणाम होईल’, असा त्यांचा विचार असतो.
१०. पू. आबांचे वैशिष्ट्य
१० अ. पू. आबांच्या मधुर हास्यातून ते उत्साह आणि चैतन्य प्रदान करत असल्याचे जाणवणे : पू. आबा माझ्याकडे पाहून हसले की, माझा दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. ते त्यांच्या प्रेमळ हास्यातून ‘उत्साह आणि चैतन्य प्रदान करतात’, असे मला जाणवते. मी कधी भावनाशील होऊन रडत असतांना पू. आबांच्या सुमधुर हास्यामुळे मला अतिशय शांत वाटते. कधी कधी पू. आबा इतके खळखळून हसतात की, त्यांचे ते हास्य पाहून ‘मला आनंदाने उड्या माराव्यात’, असे वाटते. मी बर्याच वेळा पू. आबांचे हसतांना छायाचित्र काढते. तेव्हा ‘प्रत्येक छायाचित्रामध्ये त्यांचे हास्य वेगळेच आहे’, असे मी अनुभवते. यातून ‘हास्याचेही किती पैलू असू शकतात !’, हे त्यांची छायाचित्रे पाहून कळते.
१० आ. केवळ साधकच नाही, तर समाजातील व्यक्तीही पू. आबांकडे आकर्षित होणे : पू. आबांना कुणी लांबून पाहिले, तरी त्या व्यक्तीला ‘पू. आबांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलावे’, असे वाटते. केवळ साधकच नाही, तर समाजातील व्यक्तींच्या संदर्भातही असेच घडते. पू. आबांमधील चैतन्य आणि प्रेमभाव यांच्या प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे कुणीही व्यक्ती त्यांच्याकडे लगेच आकृष्ट होते.
१० इ. पू. आबांच्या माध्यमातून ‘साक्षात् गुरुदेव बोलत आहे’, असे जाणवणे : बर्याच वेळा ‘पू. आबांच्या माध्यमातून ‘साक्षात् गुरुदेव बोलत आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द-न्-शब्द गुरुदेवांचा आहे’, असे जाणवते. पू. आबांंचे बोलणे ‘ऐकत रहावे’, असे वाटते.
११. पू. आबांनी स्वतःचा त्रास न्यून होण्यासाठी प्रार्थना न करणे; परंतु विश्वभरातील साधकांसाठी प्रार्थना करणे
पू. आबांना अनिष्ट शक्तींचा त्रास होत असतांना ते गुरुदेवांकडे स्वतःसाठी किंवा त्रास न्यून करण्यासाठी कधीही प्रार्थना करत नाहीत. ‘गुरुदेव साक्षात् श्रीमन्नारायणाचे अवतार आहेत. त्यांना आपल्यासाठी किती सहन करावे लागते आणि मी आणखीन त्यांना कशाला त्रास देऊ ?’ असे पू. आबांना वाटते. त्यामुळे ते नेहमी गुरुदेवांकडे प्रार्थना करतात, ‘हे गुरुदेवा, आपले चांगले कार्य पूर्ण होऊ नये; म्हणून अनिष्ट शक्ती अडथळे आणत आहेत. तुम्हीच मला सेवा करण्यासाठी शक्ती द्या.’
पू. आबा आधी आश्रमातील सर्व साधकांसाठी प्रार्थना करायचे की, ‘हे श्रीकृष्णा, हे गुरुदेवा, सर्व साधकांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी तुम्हीच बळ द्या.’ पू. आबांना समष्टी संत घोषित केले तेव्हा आणि त्या आधीपासूनच यांच्यात पालट जाणवू लागला. आता ते विश्वभरातील सर्व साधकांसाठी प्रार्थना करू लागले आहेत. (क्रमश: उद्याच्या अंकात)
– कु. ऐश्वर्या योगेश जोशी (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (११.३.२०२१)
भाग २. : https://sanatanprabhat.org/marathi/464043.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |