पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोनाबाधित : सर्व मंत्री आणि आमदार यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक
पणजी, २७ मार्च (वार्ता.) – पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोनाबाधित झाल्याने विधीमंडळ सचिवांनी दक्षतेचे उपाय म्हणून सर्व मंत्री आणि आमदार यांना २७ आणि २८ मार्च या २ दिवसांत कोरोनाविषयक चाचणी करणे बंधनकारक केले आहे. विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी सर्व ४० आमदार आणि त्यांचे कर्मचारी यांना जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय येथे जाऊन कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. प्रत्येक आमदाराने स्वत:च्या, तसेच त्यांच्या संपर्कात आलेले आणि त्यांचा कर्मचारीवर्ग यांच्या लाळेची चाचणी करावी. यांपैकी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार टोनी फर्नांडिस आणि त्यांच्याशी सलग्न असलेल्यांनी कोरोनाविषयक चाचणी केली आहे.
आमदार बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर
२७ मार्च या दिवशी एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या फुफ्फुसाचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे.