कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांत अंशत: संचारबंदी !
कल्याण डोंबिवली – महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले असून आजपासून कार्यवाही चालू झाली आहे.
नंदुरबार – येथे आज आणि उद्या ‘जनता कर्फ्यू’ असेल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असेल.
धुळे – येथे ४ एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ असेल. नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी घातलेली आहे.
नागपूर – येथील निर्बंध ३१ मार्चपर्यंत चालू रहाणार, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. या निर्बंधामुळे नागरिकांच्या अर्थतंत्र तसेच रोजगार यांना हानी पोचणार नाही, असे आमचे प्रयत्न रहातील, असेही राऊत यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात दळणवळण बंदीची शक्यता ?
पुणे – वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मतानुसार कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर दळणवळण बंदी आवश्यक आहे. त्यामुळे इच्छा नसली तरीही येत्या ५-६ दिवसांत अशीच रुग्णवाढ होत राहिली तर दळणवळण बंदीविना पर्याय रहाणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे घेतलेल्या बैठकीत व्यक्त केले. पुणे जिल्ह्यामधील नवी नियमावली पुढीलप्रमाणे आहे. १ एप्रिलपासून सर्व लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद करावेत. शाळा-महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद रहातील. उपाहारगृह, रेस्टॉरंट हे ५० टक्के क्षमतेसह रात्री १० वाजेपर्यंतच चालू रहातील. सार्वजनिक बस वाहतूक चालू असेल. विवाह समारंभात केवळ ५० लोकांचीच उपस्थिती असेल. अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी आहे. सार्वजनिक उद्याने आणि बागबगीचे केवळ सकाळच्याच वेळेत चालू रहातील.