अलंकार विकत घेतांना काय काळजी घ्याल ?
अलंकारांच्या दुकानात अलंकार विकत घेण्यासाठी गेल्यावर तेथे आपल्याला अलंकारांचे विविध प्रकार दिसतात. काही वेळा अलंकारांच्या विविध प्रकारांची नमुना-पुस्तिका (कॅटलॉग) दाखवण्यात येते. दुर्दैवाने अलंकारांच्या शेकडो प्रकारांपैकी केवळ ४-५ अलंकारच सात्त्विक असतात आणि अन्य सर्व तामसिक (त्रासदायक) असतात ! आपण बर्याचदा अलंकारांच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो. असे होऊ नये यासाठी –
१. सनातनच्या ग्रंथातील अलंकारांच्या छायाचित्रांसह त्यांच्या संदर्भात केलेले सूक्ष्म-ज्ञानविषयीचे प्रयोग दिले आहेत. त्यावरून ते अलंकार सात्त्विक कि तामसिक, याचा उलगडा होतो. सात्त्विक असलेले अलंकारच आपण विकत घ्यावेत.
२. अलंकार विकत घ्यायचा (खरेदी करायचा) असल्यास तो सात्त्विक कि तामसिक (त्रासदायक) आहे, हे सूक्ष्मातून ठरवता येणे आवश्यक ठरते. यासंदर्भात अध्यात्मातील जाणकार व्यक्ती किंवा सूक्ष्मातील स्पंदने ओळखता येण्याची क्षमता असलेली व्यक्ती यांना विचारून खरेदी करू शकतो.
३. अध्यात्मातील जाणकार व्यक्ती किंवा सूक्ष्मातील स्पंदने ओळखता येण्याची क्षमता असलेली व्यक्ती यांना विचारण्याची सोय नसल्यास आपणच त्या अलंकाराकडे सूक्ष्मातून पाहून चांगले कि त्रासदायक वाटते, ते ठरवायचा प्रयत्न करावा. अलंकारांतून चांगली स्पंदने जाणवल्यानंतरही १० मिनिटे आपली कुलदेवी, कुलदेव किंवा उपास्यदेवता यांपैकी एकाचा नामजप करावा. या वेळी मधे मधे ‘अलंकारावर मायावी शक्तीचे आवरण आले असल्यास ते दूर होवो’, अशी प्रार्थनाही करावी. १० मिनिटांनी पुन्हा त्या अलंकाराकडे सूक्ष्मातून पाहून चांगले कि त्रासदायक वाटते, ते ठरवावे आणि त्यानुसार अलंकार विकत घ्यावा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |