पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचे अवतारांच्या संदर्भात अनमोल मार्गदर्शन !
१. अवतार आणि सामान्य मनुष्य यांचा जन्म होतांना आईला होणार्या प्रसूती-वेदना
राम आणि कृष्ण जन्माला आले, तेव्हा त्यांच्या आईला वेदना झाल्या नाहीत. आईचे पोटही दुखले नाही. आम्ही दळभद्रे जन्माला आलो, तेव्हा आईचा अर्धा जीव आम्ही बाहेर काढला (पुष्कळ यातना दिल्या).’
२. जगातील शक्तीमान जीव आणि देवता
‘जगात सुग्रीवाचा भाऊ वाली अतिशय शक्तीमान होता आणि दुसरा हनुमान (रुद्रावतार) ! राक्षसांमध्ये रावण, कुंभकर्ण आणि घटत्कोच हेही अतिशय शक्तीमान होते. मनुष्य म्हणून जन्म घेतलेले; परंतु अवतार असणारा श्रीराम आणि वायुदेवाचा पुत्र असणारा भीम हेही शक्तीमान होऊन गेले.’
३. देव अवतार का घेतो ?
३ अ. भक्तांचा कैवारी असल्याने देवाने अवतार धारण करणे
विष्णूने मत्स्य अवतार घेतला ।
देवाने कूर्म अवतार घेतला ॥ १ ॥
हिरण्यकश्यपू मारीला देवाने भक्त प्रल्हाद तारीला ।
कंसासुराचा नाश करण्यासाठी मी तुरुंगामध्ये जन्म घेतला ॥ २ ॥
दुर्योधनाचा नाश करण्यासाठी कुरुक्षेत्रावर सांगितली गीता ।
सत्याने वागणार्या पांडवांचे रक्षण केले ॥ ३ ॥
शंखासुराचा वध करून वेद ब्रह्मदेवाला आणून दिले ।
सहस्रार्जुन माजला म्हणून मी परशुराम अवतार धरला ॥ ४ ॥
रावण माजला; म्हणून मी श्रीराम अवतार घेतला ।
अन् रावणाचा नाश केला ॥ ५ ॥
३ आ. ‘मी भक्तांचा कैवार घेण्यासाठी युगे युगे जन्म घेतो, अवतार धारण करतो’, असे देवाने अर्जुनाला सांगणे : ‘कलियुगामध्ये तोच देव हातात शस्त्रे न धरता, कमरेवर हात ठेवून विटेवर पंढरपूरमध्ये उभा आहे. कृष्ण मीच, विष्णु मी, विठ्ठल अन् पांडुरंग तोही मीच. मी केव्हाचा, कुणाचा, केवढा शोध लावणारे वेद मुखी झाले. दहा तोंडांच्या शेषनागाच्या वाचता वाचता जिभा फाटल्या. चार मुखांचा ब्रह्मदेव वेद वाचतांना थकून गेला अन् वेडा झाला. ‘मी भक्तांचा कैवार घेण्यासाठी युगे युगे जन्म घेतो, अवतार धारण करतो’, असे देव अर्जुनाला म्हणाला.’
३ इ. धर्मसंस्थापना करणारे ईश्वराचे अवतार प्रत्येक युगात असतील !
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥
– दासबोध, दशक १८, समास ६, ओवी २०
अर्थ : जे पुरुष धर्मस्थापना करतात, ते ईश्वराचे अवतार असतात. असे पुरुष पूर्वी झाले, आज आहेत आणि पुढे होतील. असे पुरुष होणे, ही ईश्वराची कृपाच आहे.
४. अवतारांचा त्याग
राम आणि कृष्ण हे दोन अवतार आताच्या मनुष्याला पुष्कळ शिकवून जातात. श्रीरामाने रावणाला मारून त्याची सोन्याची लंका आपल्यासाठी घेऊन ठेवली नाही. लंका रावणाचा भाऊ बिभीषणाला दिली. भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार संपवतांना सोन्याची द्वारका समुद्रात बुडवली.’
५. सत्य आणि असत्य यांची झुंज
जगामध्ये पूर्वीपासूनच सत्य आणि असत्य यांची झुंज चालू आहे. खोटा आणि खरा असा वाद चालू आहे. खोटी नीती आणि खरी नीती, असेही चालू आहे; परंतु ईश्वर सत्याच्या बाजूला उभा असतो. श्रीराम प्रभूंची पत्नी सीतामाईला दुष्ट रावणाने पळवून नेले, तरी श्रीरामाने लढाईमध्ये निरपराध्यांची हत्या होऊ नये, लंकेची होळी होऊ नये; म्हणून शिष्टाई करण्यासाठी (रावणाला समजावण्यासाठी) अंगदाला पाठवले; परंतु त्या दुष्ट रावणाने ऐकले नाही आणि लंकेची हानी झाली. रावणाला भाऊ आणि पुत्र गमवावे लागले. केवळ बिभीषण वाचला; कारण तो श्रीराम प्रभूंना शरण गेला होता. तो सत्याला धरून होता; म्हणून लंकेचा राजा झाला. लंका घेण्याच्या आधी श्रीरामाने बिभीषणाला दिलेले वचन सत्य केले, तसेच दुष्ट वालीला मारून सुग्रीवाला राज्य दिले आणि अंगदाला युवराज केले. पांडवांवर कौरवांनी अन्याय केला; म्हणून श्रीकृष्ण शिष्टाईसाठी गेला होता; परंतु दुष्ट बुद्धीच्या दुर्योधनाने देवाचे ऐकले नाही आणि शेवटी सर्वांचा सत्यनाश झाला. असाच अन्याय कंसासुराने वसुदेव-देवकीवर केला; परंतु शेवटी कंस मारला गेला. असाच अन्याय भक्त प्रल्हादावर त्याच्याच वडिलांनी, हिरण्यकश्यपूने केला. तेव्हा देवाने नृसिंह अवतार घेऊन भक्त प्रल्हादाचे रक्षण केले.’
– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
(पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)
(क्रमश: वाचा पुढील रविवारी)