अलंकारांची शुद्धी कशी करावी आणि शुद्धी करण्याचे आध्यात्मिक लाभ !
अलंकारांच्या शुद्धीचे विविध प्रकार
१. स्थुलातील शुद्धी
अलंकार रिठ्याच्या पाण्यात बुडवून ठेवणे : सोन्या-चांदीचे अलंकार पाच मिनिटे रिठ्याच्या पाण्यात बुडवून ठेवावेत. त्यानंतर हलक्या हाताने चोळल्यावर त्यावरील धूळ आणि मळ जाऊन अलंकार स्वच्छ होतात.
२. सूक्ष्मातील शुद्धी
‘आजकाल जवळ जवळ प्रत्येकालाच अधिक-उण्या प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतो. त्रास असलेल्या व्यक्तीने परिधान केलेल्या अलंकारांत वाईट शक्ती काळी शक्ती साठवून ठेवतात. या काळ्या शक्तीचे प्रक्षेपण त्या व्यक्तीच्या शरिरात होऊ लागते, तसेच या काळ्या शक्तीमुळे व्यक्तीचा अलंकार घातलेला अवयव दुखू शकतो. त्यामुळे अलंकारांकडे पाहून नकोसे वाटल्यास किंवा अलंकार घातल्यानंतर त्रास जाणवल्यास त्या अलंकारांची त्रासाच्या तीव्रतेनुसार पुढील तत्त्वांनी शुद्धी करावी.
अ. तेजतत्त्व : अलंकारांना सर्व अंगांनी विभूती लावावी.
आ. वायूतत्त्व : अलंकारांवर विभूती फुंकरावी किंवा उदबत्ती पेटवून तिचा धूर अलंकारांवर जाऊ द्यावा.
इ. आकाशतत्त्व : अलंकार रिकाम्या खोक्यात (टीप १) ठेवावेत आणि / किंवा त्यांच्याजवळ प.पू. भक्तराज महाराजांची भजने (टीप २) लावावीत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
टीप १ – रिकाम्या खोक्यात पोकळी निर्माण होते. पोकळी निर्गुण तत्त्वाचे प्रतीक आहे. निर्गुण तत्त्वामुळे काळी शक्ती नष्ट होते.
टीप २ – प.पू. भक्तराज महाराज हे सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान आहेत. प.पू. भक्तराज महाराजांसारख्या अत्युच्च पातळीच्या संतांनी ही भजने स्वतः लिहिली आहेत, त्यांना संगीत दिले आहे आणि स्वतः म्हटली आहेत. त्यामुळे या भजनांत शब्दशक्तीसह नादशक्ती आणि चैतन्य असल्याने अलंकारांतील काळी शक्ती दूर होते.
३. विभूतीने होणारी शुद्धी
अलंकारांना विभूती लावून ते परिधान केल्याने होणारा लाभ : एरव्ही अलंकार परिधान केल्यावर व्यक्तीच्या शरिरातील काळी शक्ती उणावतेच; परंतु अलंकारांना विभूती लावून ते परिधान केल्यावर विभूतीचा परिणाम असेपर्यंत व्यक्तीच्या शरिरातील काळी शक्ती अधिक प्रमाणात उणावते, तसेच व्यक्तीला त्रास देणार्या वाईट शक्तींचे बळही (जोरही) उणावते. (यासंदर्भात सनातनच्या साधिकेने केलेले विविध सूक्ष्मातील प्रयोग ‘स्त्रियांनी अलंकार का घालावेत ?’ या लघुग्रंथात दिले आहेत.)
४. वाईट शक्तीचा परिणाम झालेल्या अलंकारांची शुद्धी होण्यास लागणारा कालावधी
एक विद्वान : वाईट शक्तीचा परिणाम झालेले अलंकार काढून ठेवल्यास १० टक्के लाभ होतो. अलंकार विभूतीचा लेप लावून ठेवल्यास १५ दिवसांत त्यांवरील आवरण उणावते. नुसतेच अलंकार काढून ठेवल्याने तीन मासांनंतर त्यांतील काळी शक्ती उणावते. [(श्रीचित्शक्ति) सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००५, रात्री ७.५३]
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ : अलंकारशास्त्र)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |