गोव्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ : शासन नवीन मार्गदर्शक तत्त्वे आज प्रसिद्ध करणार
शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणूक रहित
पणजी, २६ मार्च (वार्ता.) – राज्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासन नवीन मार्गदर्शक तत्त्वे २७ मार्चला घोषित करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
अपक्ष आमदार रोहन खवटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. या लक्षवेधी सूचनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. आमदार रोहन खंवटे यांनी प्रारंभी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे प्रयत्न अल्प पडत असल्याचा आरोप केला. या प्रकरणी विरोधी गटातील सदस्यांनीही सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही समुद्रकिनार्यांवरील पार्ट्या आणि शासनाची मान्यता असलेली प्रदर्शने (एक्झिबीशन) यांठिकाणी कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.
एका तरंगत्या कॅसिनोत कोरोनाचा संसर्ग झालेले ३१ रुग्ण सापडले, तरी कॅसिनो चालूच !
मांडवीतील एका तरंगत्या कॅसिनोत कोरोनाचा संसर्ग झालेले ३१ रुग्ण सापडले; मात्र हा तरंगता कॅसिनो अजूनही चालूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांना एका इमारतीत ठेवून कॅसिनो चालूच ठेवण्यात आला आहे, असा आरोप आमदार रोहन खंवटे यांनी केला. याला उत्तर देतांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘कॅसिनोवरील संबंधित कर्मचार्यांना त्या इमारतीतून अन्यत्र नेऊन तो भाग लघु प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर काढण्यात येणार आहे. कॅसिनोच्या कर्मचार्यांची ठराविक कालावधीत कोरोनासंबंधी चाचणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतून येणार्या प्रवाशांना कोरोनासंबंधी नकारात्मक दाखले आणणे बंधनकारक करण्यात येणार नाही; कारण प्रवासी आणत असलेल्या दाखल्याच्या सतत्येविषयी प्रश्नचिन्ह आहे.’’ प्राप्त माहितीनुसार आरोग्य खात्याच्या ‘एडवायझरी’नुसार कॅसिनो भाग लघु प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करणे आणि संबंधित विभाग ‘सील’ करणे आवश्यक असूनही जिल्हा प्रशासनाने कॅसिनो लघु प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केलेला नाही.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासनपुरस्कृत शिमगोत्सव मिरवणूक रहित
राज्यात वर्ष २०२१ साठी आयोजित शासन पुरस्कृत शिमगोत्सव मिरवणूक रहित करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. शिमगोत्सवासाठी ज्या गटांनी चित्ररथ सिद्ध केले आहेत, त्यांना भरपाई देण्यात येईल. पारंपरिक शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून चालू ठेवू शकतो आणि यासाठी निराळी अनुज्ञप्ती घेण्याची आवश्यकता नाही.’’