रश्मी शुक्ला यांच्या विरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा करणार !
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे प्रतिपादन
पुणे – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर पांघरूण घातल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. त्या वेळी फडणवीसांनी ऑडिओ सीडी आणि माजी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त (एस्.आय.डी.) प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला होता. त्याला उत्तर देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘रश्मी शुक्ला सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या’, असा गंभीर आरोप केला होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपलाही फोन टॅप झाला, असे म्हणून ‘रश्मी शुक्ला यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा आपण प्रविष्ट करणार आहोत’, असे सांगितले.
उमेश पाटील यांनी सांगितले की, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी असतांना रश्मी शुक्ला यांनी २० ऑगस्ट २०२० आणि २५ ऑगस्ट २०२० या दिवशी राज्याचे पोलीस महासंचालक यांना गोपनीय अहवाल पाठवला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या अहवालाची प्रत त्यांनी पाठवली होती. त्यामध्ये पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये मध्यस्थी किंवा दलाली करणारे रॅकेट आणि त्या संदर्भातील भ्रमणभाषचे सीडीआर् पडताळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामध्ये काही लोकांचे सीडीआर् संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. या सर्व नमूद अहवालांमध्ये माझ्या नावाचा उल्लेख असल्याने आणि अहवाल समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने मी ही तक्रार करत आहे. त्यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची भरून न येणारी हानी झाली आहे.