माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांची नवी मुंबई येथे ३९ वी पुण्यतिथी साजरी
नवी मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – माथाडी कामगार संघटनेचे (संस्थापक) स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची ३९ वी पुण्यतिथी २३ मार्च या दिवशी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, अण्णासाहेब यांचे पुत्र माजी आमदार नरेंद्र पाटील, तसेच माथाडी कामगार संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनामुळे ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण ‘ऑनलाईन’ पद्धतीनेही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जनसंपर्क अधिकारी आणि संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले.
अण्णासाहेब यांनी दुर्बल मराठा समाजाला माथाडी कामगार संघटनेच्या रूपाने संघटित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले ! – नरेंद्र पाटील
मराठा समाज जातीनिहाय आरक्षणामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता. अहोरात्र कष्ट करूनही हमाल किंवा गडी म्हणून संबोधला जात असे. अशा वेळी प्रवास आणि संपर्क यांची असुविधा असतांनाही त्यांना संघटित करण्याचे ऐतिहासिक कार्य स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे. अण्णासाहेब यांना राजकारणात स्वतःचे मोठे स्थान निर्माण करता आले असते; मात्र कामगारांसाठी प्रामाणिकपणे काम करून त्यांनी माथाडी कामगारांची संघटना निर्माण केली आणि त्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहिले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आम्हीही माथाडी कामगारांसाठी नेहमीच सतर्क राहून कार्य करत आहोत. कोरोनाची परिस्थिती पहाता सर्व माथाडी कामगारांना नि:शुल्क लसीकरणाची मागणी नवी मुंबई महापालिकेला केली आहे.