महावितरणने वीजदेयकाच्या संदर्भात ग्राहकांची पिळवणूक थांबवावी ! – वैद्य संजय गांधी
२४ प्रकारच्या व्यापारी संघटनांची एकत्रित बैठक
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – विठ्ठल मंदिर येथील बैठकीमध्ये विविध क्षेत्रांतील २४ प्रकारच्या व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन महावितरणच्या अधिकार्यांना धारेवर धरले. सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी प्रास्ताविकामध्ये महावितरणने सामान्य व्यापारी आणि सामान्य वीजग्राहक यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पिळवणूक थांबवावी. दळणवळण बंदीच्या काळात व्यापार मंदावला आणि परिणामी अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचा विचार करून महावितरणने दळणवळण बंदी काळातील व्यापारी देयक घरगुती देयकाप्रमाणे आकारावे, असे आवाहन केले.
अखिल ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हा संघटक श्री. जगन्नाथ जोशी म्हणाले, ‘‘केवळ कायद्याची ढाल पुढे करून महावितरणने वीजग्राहकांना त्रास न देता माणुसकीच्या दृष्टीकोनातून पहावे.’’ मलकापूरचे नगराध्यक्ष श्री. अमोल केसरकर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. सर्जेराव पाटील यांनी व्यापारी अन् सामान्य वीजग्राहक यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शाहूवाडी महावितरणचे उपअभियंता शामराज यांनी ग्राहकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिले. ही बैठक यशस्वी होण्यासाठी सर्वश्री महेश विभूते, महेश कोठावळे, स्वरूप गांधी, विजय गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.