साधकांच्या साधनेची घडी बसवून सर्वांना निखळ आनंद देणार्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये !
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या समवेत मला ६ मास सोलापूर येथील सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. या कालावधीत, तसेच त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. साधकांच्या व्यष्टी साधनेविषयी तळमळ
१ अ. व्यष्टी साधनेची घडी बसवल्याने साधकांची प्रगती होणे : कोरोना महामारीमुळे प्रसारातील सर्व सेवा ‘ऑनलाईन’ चालू होत्या. या कालावधीत सद्गुरु ताईंनी साधकांसाठी (विविध साधनेचे मार्गदर्शनपर) ‘ऑनलाईन’ सत्संग घेतले आणि व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे नियोजन केले. त्यामुळे साधकांच्या व्यष्टी साधनेची घडी बसली आणि या वर्षभरात अनेक साधकांची आध्यात्मिक प्रगती झाली. तसेच पूर्वी ज्या साधकांकडून व्यष्टी होत नव्हती, त्यांचेही साधनेचे प्रयत्न चालू झाले. साधक बाहेर पडून सेवा करू शकत नव्हते, तरीही साधनेचे प्रयत्न वाढल्याने त्यांच्या आनंदात वाढ झाली.
१ आ. व्यष्टी आढावा घेऊन चुका सांगणे आणि अंतर्मुखता वाढणे : माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा सद्गुरु ताई घेतात. आढाव्याच्या माध्यमातून प्रतिदिन करायच्या व्यष्टी प्रयत्नांची दिशा मिळते आणि त्या समवेत अहं निर्मूलन, स्वतःमध्ये करायचे पालट, तसेच आपल्याकडून होणार्या चुकांची जाणीव होण्यासाठी सद्गुरु ताई वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आपल्या समवेत सेवा करणार्या साधकांपैकी किती जणांना आपण दिवसभरात स्वत:कडून झालेल्या चुका विचारल्या ? मनाचा आढावा किती वेळा घेतला ? ज्या चुका आपल्याकडून झाल्या, त्यासाठी दिवसभरात किती वेळा शिक्षा करून घेतली ? इत्यादींविषयी ताई आढावा घेतात. त्यामुळे प्रयत्नांमधील अंतर्मुखता वाढून साधकांचे साहाय्य घेणे अन् शिक्षापद्धत लागू करणे, असे प्रयत्न होतात.
१ इ. चुकांच्या बैठका घेऊन साधकांच्या साधनेत आणि गुरुकार्यात साहाय्य करणे : सेवाकेंद्रात साधकांकडून होणार्या चुकांच्या सद्गुरु ताई बैठका घ्यायच्या. ‘साधकांची साधना आणि गुरूंच्या आश्रमातील कोणतीही गोष्ट यांची हानी होऊ नये, याची त्यांना सतत तळमळ असते. त्यासाठी त्यांना स्वतःला कितीही कष्ट घ्यावे लागले, तरी त्या आनंदाने आणि उत्साहाने घेतांना दिसतात.
१ ई. स्वतःच्या शारीरिक त्रासांचा विचार न करता साधकांच्या साधनेला प्राधान्य देणे : ताई सतत सेवारत असतात. त्यांना बरेच शारीरिक त्रासही आहेत; पण त्याविषयी त्या कधीच सांगत नाहीत. काही वेळा त्यांना सेवांमुळे रात्री झोपण्यास पुष्कळ उशीर होतो; पण त्या सकाळी साधकांचे व्यष्टी आढावे घेण्यासाठी पुन्हा लवकर उठतात. त्या वेळी ‘माझ्यामुळे साधकांचे आढावे थांबायला नकोत’, असा त्यांचा विचार असतो.
२. समष्टी सेवा
२ अ. साधकांची साधना आणि सेवा यांतील अडचणी सोडवणे अन् साधकांची आईप्रमाणे काळजी घेणे : सद्गुरु ताई सेवाकेंद्रातील साधकांच्या सेवेत किंवा साधनेत येणार्या अडचणी सोडवतात. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो. कुटुंबामध्ये जशी आई सर्वांत जवळची आणि हक्काची असते, तसे सेवाकेंद्रात सर्व वयोगटांतील साधकांच्या सद्गुरु ताई आध्यात्मिक आई आहेत. कुणाला कशाचीच न्यूनता जाणवू नये, याची सतत काळजी घेणे, कुणी काही कारणाने रुग्णाईत असल्यास त्याच्या जेवणाचे पहाणे, त्यांच्या नामजपादी उपायांसंदर्भात विचारणे इत्यादींमध्ये त्या जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी त्या स्वत: घरगुती औषध किंवा काढे बनवून साधकांना देत असत.
२ आ. सेवाकेंद्रात आलेल्या भाज्या निवडण्यासाठी साधकांच्या सामूहिक सेवेचे नियोजन करणे आणि स्वतः सेवेत सहभागी होणे : सेवाकेंद्रात अर्पणमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी यायची. ती खराब होऊ नये, यासाठी त्या वेळेत निवडून ठेवाव्या लागत असत. या सेवेसाठी सद्गुरु ताई सर्व साधकांच्या सामूहिक सेवेचे नियोजन करण्यास सांगत आणि स्वतःही सेवेत भाग घेत असत. त्यामुळे सर्वांनाच या सेवेतील आनंद घेता येत असे.
२ इ. सेवेचे नियोजन करून दिल्यामुळे साधकांची क्षमता वाढून त्यातून शिकता येणे : मध्यंतरी काही अडचणींमुळे आश्रमात स्वयंपाकघरातील सेवा करण्यासाठी साधकसंख्या अल्प होती. तसेच प्रसारातील सेवांचे नियोजनही पहायचे होते. या कालावधीत मला आणि दीपालीताईला (कु. दीपाली मतकर यांना) प्रसार अन् स्वयंपाकघरातील नियोजन कसे करू शकतो, हे सद्गुरु ताईंनी शिकवले. त्या आमच्या समवेत थांबून आम्हाला साहाय्य करायच्या. त्यांच्यामुळे आम्हाला कोणत्याच सेवेचा ताण आला नाही. उलट ‘देव आमची क्षमता वाढवत असून त्या सेवेतून शिकवत आहे’, हे आम्हाला अनुभवता आले.
२ ई. युवा साधकांना अल्प कालावधीत घडवणे : सेवाकेंद्रात काही युवा साधक सुट्टीसाठी किंवा काही दिवस आश्रमजीवन शिकण्यासाठी येतात. सद्गुरु ताई त्यांच्या साधनेकडे, त्यांना काही अडचण किंवा ताण येत नाही ना, शिकण्यातील आणि सेवेतील आनंद ते घेत आहेत ना, याकडे लक्ष देतात. त्यामुळे नवीन आलेले साधकही अतिशय अल्प वेळेत आश्रमजीवनाशी एकरूप होऊन जातात. तसेच सद्गुरु ताई त्यांचे कौशल्य आणि क्षमता पाहून त्यांच्या सेवेचे नियोजन करतात. त्यामुळे युवा साधक अल्प वेळेत घडतात.
३. साधकांच्या अडचणी आध्यात्मिक स्तरावर सोडवणे
सेवाकेंद्रात संगणकीय सेवांसाठी आम्ही काही साधक एकत्रित बसायचो. त्या वेळी सेवा करतांना पुष्कळ अडचणी येत असत. यावर सद्गुरु ताईंनी आम्हाला विविध आध्यात्मिक उपाय सांगितले, उदा. सेवेच्या ठिकाणची शुद्धी करणे, सेवेच्या ठिकाणी देवतांची चित्रे लावणे, उदबत्ती लावणे, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावणे. यांमुळे अडचणी सुटून सेवेचे ठिकाण दैवीलोकाप्रमाणे असल्याचे अनुभवता येत असे.
४. भाववृद्धीसाठी विविध प्रयोग सांगून साधकांना भावस्थितीत ठेवणे
४ अ. व्यष्टी आढावा घेण्यापूर्वी भावार्चना केल्यामुळे दिवसभर भावस्थितीत रहाण्यास साहाय्य होणे : आमचा व्यष्टी साधनेचा आढावा सकाळी लवकर असतो आणि व्यष्टी आढावा घेण्यापूर्वी ताई स्वत: भावार्चना सांगतात. त्यामुळे दिवसाचा आरंभ भावमय स्थितीत होतो. यातूनही ‘साधकांसाठी काय आणि किती करू ?’, ही ताईंची तळमळ शिकायला मिळते.
४ आ. सामूहिक नामजपाच्या वेळी भावप्रयोग केल्याने नामजप करतांना भावाची स्थिती निर्माण होणे आणि दिवसभरात भावप्रयोग करण्याचे प्रमाण वाढणे : सेवाकेंद्रात सामूहिक नामजपाच्या वेळी सद्गुरु ताई साधकांसाठी भावप्रयोग घेत असत. ताई भावप्रयोग करण्याआधी सर्वांना मन एकाग्र करून वातावरण अनुभवण्यास सांगतात. यामुळे मनाची एकाग्रता पुष्कळ वाढते. तसेच सर्वच देवतांचे भावप्रयोग केल्याने साधकांना निरनिराळे भाव अनुभवण्यास साहाय्य होते. साधकांची नामजप करतांना भावाची स्थिती निर्माण होते. दिवसभरात भाववृद्धीसाठी प्रयोग करण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.
५. प्रेमभाव
५ अ. साधक आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी त्यांच्या स्थितीला जाऊन प्रेमाने संवाद साधल्याने ते भावविभोर होणे : सेवाकेंद्रात येणारे साधकांचे नातेवाईक आणि प्रसारातील साधक यांची सद्गुरु ताई पुष्कळ आत्मीयतेने विचारपूस करतात. साधक बाहेरून आल्यावर त्यांची साधना आणि कुटुंबीय यांच्याविषयी मोकळेपणाने संवाद साधतात. ताईंच्या या प्रेमामुळे साधक भावविभोर होतात. सेवाकेंद्रात जेवढे साधक आहेत, त्या सर्वांकडेच सद्गुरु ताईंचे लक्ष असते.
‘हे गुरुमाऊली, आम्हा साधकांच्या साधनेसाठी सद्गुरु संतांचा सत्संग वेळोवेळी देऊन आमच्या साधनेची काळजी तुम्हीच घेत आहात. या अमूल्य संधीचा लाभ करून घेण्यासाठी आम्ही तुमच्या चरणीच शरण आलो आहोत, गुरुमाऊली !’
– कु. वैभवी भोवर, पुणे (१३.३.२०२१)
सद्गुरु स्वातीताई घडवती साधकांना आध्यात्मिक आईसमान ।सद्गुरु स्वातीताई म्हणजे सर्वांकरिता निखळ आनंद । साधकांची आध्यात्मिक उन्नती हाच अखंड ध्यास । त्यांच्या सहवासातून शिकवण मिळे गुरूंच्या आदर्श शिष्याची । गुरुसेवेसाठी तळमळ असे सतत त्यांच्या मनात । लहान थोर सर्वच साधकांना ताईंचा आधार असे मोठा । सद्गुरु ताई, सत्संग दिला अमूल्य मजला सर्वतोपरी । – कु. वैभवी भोवर, पुणे (१३.३.२०२१) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |