२० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला लस देणार्या देशांतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट !
भारतात अद्याप केवळ ३.४ टक्केच लसीकरण
नवी देहली – भारतात कोरोनाची दुसरी लाट चालू आहे, तर युरोपमध्ये तिसरी लाट आहे. जगातील १३७ देशांमध्ये सध्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचे डोस दिले जात आहेत. आतापर्यंत जगात ४८ कोटी लोकांना डोस देण्यात आले आहेत. जगात ज्या देशांतील २० टक्के लोकसंख्येला डोस देण्यात आले आहेत त्या देशांतील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये २५ टक्के लोकसंख्येला लसीचा एकतरी डोस देण्यात आला आहे. यामुळे तेथील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. भारतात आतापर्यंत केवळ ३.४ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. भारतात आतापर्यंत ४ कोटी ६२ लाख लोकांना डोस देण्यात आले आहेत. देशात प्रतिदिन ६० सहस्र नवीन रुग्ण आढळून येत आहेत.