होळीचे निमित्त साधून प्रभु श्रीराम यांनी लक्ष्मणाला दिलेली एक अनुपम भेट !
फाल्गुन पौर्णिमेला (२८ मार्च २०२१ या दिवशी) होळी हा उत्सव आहे. यानिमित्ताने…
होळीच्या दिवशी लक्ष्मणाला प्रभु श्रीरामांची चरणसेवा मिळाली होती. त्याविषयी प्रचलित असलेली लोककथा येथे देत आहोत.
१. श्रीरामांंची चरणसेवा लक्ष्मणाऐवजी सीतामाता करू लागणे आणि चरणसेवेची संधी मिळत नसल्याने लक्ष्मण दुःखी होणे
‘श्रीराम विवाहानंतर अयोध्येला आले. तेव्हा त्यांची चरणसेवा लक्ष्मणाऐवजी सीतामाता करू लागल्या. लक्ष्मण चरणसेवा करण्यासाठी गेल्यानंतर सीता ‘नाही’ म्हणत नसत; परंतु मर्यादेनुसार जोपर्यंत सीतामाता स्वतः बोलावणार नाहीत, तोपर्यंत तेथे जाणे लक्ष्मणाला योग्य वाटत नसे; म्हणून लक्ष्मणाला बाहेर तिष्ठत उभे रहावे लागत असे. सीता लक्ष्मणाला बोलावत नसल्याने त्याला चरणसेवेची संधी मिळत नसे. परिणामस्वरूप लक्ष्मण दुःखी राहू लागले. ‘श्रीरामाची चरणसेवा मिळाली नाही, तर जगण्यात काय अर्थ आहे ?’, या विचाराने लक्ष्मणाचे शरीर कृश होऊ लागले.
२. लक्ष्मणाने प्रभु श्रीरामांना त्यांची चरणसेवा मिळण्यासाठी उपाय विचारणे
यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
श्रीराम : लक्ष्मणा, तुझे शरीर का कृश झाले आहे ?
लक्ष्मण : प्रभु, तुम्हाला ठाऊकच आहे की, काही दिवसांपासून मला तुमची चरणसेवा मिळाली नाही.
श्रीराम : जेव्हा तू माझ्या सेवेसाठी येथे येतोस, तेव्हा तुला कोण ‘नाही’ म्हणते का ?
लक्ष्मण : मातोश्री मला पाहूनही बोलवत नाहीत. प्रभु, मी तुमच्या चरणसेवेविना जगू शकत नाही !
श्रीराम : यात मी काय करू शकतो ? ती धर्मपत्नी आहे, तिचा प्रथम अधिकार आहे.
लक्ष्मण : प्रभु, एखादा उपाय सुचवावा.
३. प्रभु श्रीरामांनी लक्ष्मणाला होळीच्या दिवशी सीतामातेकडे चरणसेवा करण्याचा वर मागण्यास सांगणे
श्रीराम : लक्ष्मणा, एक उपाय आहे. ४ दिवसांनी होळीचा सण येत आहे. तुला तर ठाऊकच आहे, आपल्या रघुकुळात अशी रित (परंपरा) आहे की, या दिवशी दीर वहिनीसमवेत होळी खेळतो आणि संध्याकाळी वडिलधार्यांसमक्ष दीर जे काही मागतो, ते वहिनीला द्यावेच लागते. या वेळी तू, शत्रुघ्न आणि भरत सीतेसह होळी खेळून संध्याकाळी तिच्याकडे वर मागायला जा, तेव्हा तू तुझे मनोरथ पूर्ण कर.
प्रभुने सांगितलेल्या युक्तीमुळे लक्ष्मण नाचू लागले आणि अधीर होऊन म्हणू लागले, ‘‘आता होळी लवकर यावी, असे काही करा.’’
श्रीराम : होळी जेव्हा येणार, तेव्हाच येईल ना !
लक्ष्मणाने होळीचा जप करायला आरंभ केला की, होळी लवकर येवो.
४. भरत, शत्रुघ्न यांनी मागितलेला वर सीतामातेने देणे; परंतु लक्ष्मणाने श्रीरामांच्या चरणसेवेचा वर मागितल्यावर सीतामाता मूर्च्छित होणे
चार दिवस पूर्ण झाले आणि होळीचा दिवस उजाडला. विविध रंगांचे दर्शन होऊ लागले. सीतामातेसह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न पवित्रतापूर्वक होळी खेळले. सायंकाळ होताच सर्वप्रथम भरत सीतामातेजवळ गेले आणि नमस्कार करून म्हणाले, ‘‘मला असा वर द्या की, मी जन्मोजन्मी प्रभु श्रीरामांच्या श्रीचरणी राहो आणि त्यांची भक्ती प्राप्त होवो.’’ त्यावर सीतामाता म्हणाल्या, ‘‘तथास्तु’’ अर्थात् असेच होईल.
नंतर शत्रुघ्नची वेळ आली. ते म्हणाले, ‘‘दादांनी जन्मोजन्मी प्रभु श्रीरामांची भक्ती मागितली, तर मला जन्मोजन्मी भरतदादांची भक्ती मिळो. मी त्यांची सेवा करीन. श्रीरामांच्या सेवकाचा सेवक होईन.’’ यावरही सीतामाता ‘तथास्तु’ म्हणाल्या. यानंतर सीता लक्ष्मणास म्हणाल्या, ‘‘तुम्ही मागा.’’ लक्ष्मण म्हणाला, ‘‘मातोश्री, होळीनिमित्त मला दुसरे काहीही नको, केवळ श्रीरामांच्या चरणसेवेचा अधिकार मला मिळावा.’’
प्रभु श्रीरामांच्या चरणसेवेचा अधिकार मागण्याची गोष्ट ऐकताच सीतामाता मूर्च्छित (बेशुद्ध) झाल्या; कारण रघुवंशाच्या सून असल्यामुळे त्या वचनभंग करू शकत नव्हत्या.
५. माता सीतेची मूर्च्छा दूर करण्यासाठी प्रभु श्रीरामांनी एक युक्ती सांगणे आणि त्यानुसार सीतामाता अन् लक्ष्मण दोघांनाही श्रीरामांच्या चरणसेवेची संधी मिळणे
वैद्यांनी औषधे दिली, तरीही सीतामातेची मूर्च्छा दूर झाली नाही. तेव्हा लक्ष्मणाने प्रभु श्रीरामांकडे धाव घेतली. श्रीरामांनी लक्ष्मणाला एक युक्ती सांगितली. त्यानुसार लक्ष्मण सीतामातेजवळ गेले आणि त्यांच्या कानात हळूच म्हणाले, ‘‘मातोश्री, चरणसेवेच्या अधिकाराची आपण दोघे वाटणी करून घेऊ. उजवे चरण माझे आणि डावे चरण तुमचे ! जेव्हा तुम्ही चरणसेवा करण्यासाठी जाल, तेव्हा तुम्ही स्वतः मला बोलवाल.’’ हे ऐकून सीतामातेची मूर्च्छा दूर झाली. प्रभु श्रीरामांनी सांगितलेल्या युक्तीमुळे सीता आणि लक्ष्मण दोघेही आनंदी झाले.’
(संदर्भ : मासिक ‘लोक कल्याण सेतू’)