गोव्यात खाणी चालू करण्यावर विधानसभेतील सर्व सदस्यांचे एकमत
पणजी, २५ मार्च (वार्ता.) – गोव्यातील बंद असलेल्या खाणी लवकरात लवकर चालू कराव्या, या मागणीवर विधानसभेतील सर्व सदस्यांचे एकमत दिसून आले. खाण व्यवसाय हा गोव्याचा कणा आहे; मात्र शासन खाणी चालू करण्याची प्रक्रिया धिम्या गतीने करत असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला.
विधानसभेत खाण व्यवसाय चालू करण्यासंबंधी आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले, ‘‘खाण व्यवसायावर ट्रकमालक, बार्जमालक, कंत्राटदार आणि इतर यांचे जीवनमान पूर्णपणे अवलंबून आहे. गोवा शासनाने खाणी चालू करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे; मात्र हे महामंडळ स्थापन करून प्रश्न खरोखरच सुटणार आहे का ?’’ आमदार आलेक्स रेजिनाल्ड म्हणाले, ‘‘वर्ष २०१२ पासून खाण व्यवसाय बंद आहे; मात्र त्या काळापासून खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करण्यास शासनाला अपयश आले आहे.’’ (शासनावर खाण व्यवसायावरून टीका करणारे उपाययोजनाही सांगतील का ? अन्यथा ही टीका म्हणजे विरोधासाठी विरोध असे ठरेल ! – संपादक)