अर्थसंकल्पात गोशाळांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद
पणजी, २५ मार्च (वार्ता.) – राज्यात प्रत्येक गाव आणि शहर येथे मोकाट गुरांची समस्या आहे. मोकाट गुरांना निवारा शेड पुरवणार्या गोशाळांसाठी राज्याच्या वर्ष २०२१-२२ साठीच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडतांना गोशाळा स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
गोवा विद्यापिठात ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ उभारणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा अर्थसंकल्प मांडतांना उच्च शिक्षणासाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने गोवा विद्यापिठात, ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’, तसेच गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स येथे नाट्य कला विषयाचे ‘विष्णु सूर्या वाघ अध्यासन’, गोवा संगीत विद्यालयात शास्त्रीय संगीत विषयाचे ‘पंडित जितेंद्र अभिषेकी अध्यासन’ आणि गोवा कला महाविद्यालयात मॉडर्न आर्ट्स विषयाचे ‘लक्ष्मण पै अध्यासन’, यांचा समावेश आहे.