सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्यासाठी ‘सोनेरी ग्रुप’चे ‘भीक मागा आंदोलन’
अशी मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
सातारा, २५ मार्च (वार्ता.) – कोरेगाव (जिल्हा सातारा) येथे नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करावे, यासाठी सोनेरी ग्रुपच्या वतीने भीक मागा आंदोलन करण्यात आले.
कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने जुना मोटार स्टँड परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी एकमेव स्वच्छतागृह उभे करण्यात आले आहे; मात्र ते बंद आहे. हे स्वच्छतागृह खुले करावे, यासाठी काही मासांपासून विविध आंदोलने करून नगरपंचायतीला चेतावणी देण्यात आली होती. त्या वेळी नगरपंचायत अधिकारी यांनी स्वच्छतागृह लवकरात लवकर खुले करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप खुले करून दिलेले नाही. शेवटी कंटाळून ‘सोनेरी ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे आणि त्यांचे सहकारी यांंनी २२ मार्च या दिवशी ‘भीक मागा आंदोलना’स प्रारंभ केला.
या प्रकरणी पालिका मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, ‘‘हे स्वच्छतागृह चालू करण्यासाठी स्वच्छता अभियानाच्या मुंबई कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आवश्यक व्यय करण्यास मान्यता प्राप्त झाली की, स्वच्छतागृह सर्वांसाठी खुले करण्यात येईल. याविषयीचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे.’’