इंधनाअभावी एस्.टी.चा वेग मंदावला
एस्.टी.चा भोंगळ कारभार !
सातारा, २५ मार्च (वार्ता.) – मागील आठवड्यातील राष्ट्रीयीकृत अधिकोष (बँक) सलग ५ दिवस बंद राहिल्यामुळे एस्.टी. बसगाड्यांवर याचा चांगलाच परिणाम झाला आहे. इंधनासाठी पैसे पाठवू न शकल्यामुळे जिल्ह्यांतील सर्वच आगारातील डिझेल संपले आहे. परिणामी इंधनाअभावी जिल्ह्यातील एस्.टी.बसगाड्यांचा वेग मंदावला आहे.
अधिकोष बंद असल्यामुळे एस्.टी. महामंडळाला पैसे पाठवता येत नव्हते. इंधन आस्थापनाने उधारी बंद केली आहे. त्यामुळे आगाऊ रक्कम पाठवल्याविना इंधनाचा टँकर आस्थापन पाठवत नाही. यामुळे पाटण, वाई, मेढा, महाबळेश्वर आगारांमध्ये इंधनाचा पुरवठा झालेला नाही. यामुळे काही ठिकाणी ग्रामीण भागातील अनेक फेर्या रहित कराव्या लागल्या, तर काही अल्प कराव्या लागल्या आहेत. फलटण आणि कराड आगारातील इंधन साठाही संपत आला आहे. वाई, मेढा, महाबळेश्वर आगारांतील एस्.टी.बसगाड्यांमध्ये सातारा आगारातून इंधन भरले जात आहे. त्यामुळे सातारा आगारात एस्.टी.मध्ये इंधन भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत तसेच इंधन साठाही संपत आला आहे.