विद्यापिठात असलेली मराठेशाहीपासूनची दुर्मिळ चित्रे धूळ-बुरशीत खितपत !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे अक्षम्य दुर्लक्ष

दुर्मिळ चित्रांचे जतन करण्यासाठी असंवेदनशील असणार्‍यांना चित्रांचे महत्त्वच ठाऊक नाही, असेच म्हणावे लागेल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांनी यामध्ये पुढाकार घेऊन चित्रांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच विद्यापिठातील संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

पुणे – मराठेशाहीतील प्रमुख नेते सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांची चित्रे स्कॉटलंडमधून आलेल्या जेम्स वेल्स या चित्रकाराने काढली होती. ती चित्रे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात आहेत. तसेच संत ज्ञानेश्‍वर, समर्थ रामदास स्वामी आणि संत गाडगेबाबा यांचीही चित्रे आहेत. अनुमाने २२५ वर्षे जुनी चित्रे धूळखात पडलेली आहेत. काही चित्रांना बुरशी आलेली आहे, तर काही चित्रांचे कॅनव्हास फाटणे, रंगांचे पोपडे पडणे, असे प्रकार झाले आहेत. त्यामुळे या चित्रांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, तातडीने जतन न झाल्यास हा चित्रांचा ठेवा नष्ट होऊ शकतो, अशी स्थिती आहे. असे असूनही विद्यापिठाने चित्रांच्या जतनासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद न करता अन्य कोणतीच ठोस उपाययोजना काढलेली नाही, अशी माहिती पुरातत्व विभागाचे संचालक आणि चित्रांच्या जतन समितीचे अध्यक्ष डॉ. तेजस गर्गे यांनी दिली.

चित्रांची स्थिती समजल्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘ऑनलाईन’ बैठक घेऊन मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या चित्रांच्या जतनाचे काम पूर्ण करून, त्या चित्रांचे स्वतंत्र दालन करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर चित्रांच्या जतनासाठी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नियुक्त केली. पुरातत्व विभागाच्या वतीने विद्यापिठातील चित्रांची पहाणी करून जतन करण्यासाठी १ कोटी २३ लाख २५ सहस्र रुपयांच्या व्ययाचा प्रस्ताव ३ फेब्रुवारीला विद्यापिठाला देण्यात आला होता; मात्र विद्यापिठाने या प्रस्तावाला काहीच प्रतिसाद दिलेला नाही.

यावर पुरातत्व विभागाने दिलेला प्रस्ताव खर्चीक असल्याने चित्रांच्या जतनासाठी अन्य तज्ञांकडून प्रस्ताव मागवण्याचा विचार चालू असल्याची माहिती विद्यापिठातील सूत्रांनी दिली. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यापिठापुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगत नवे कोणतेही प्रकल्प अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चित्रांच्या जतनासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले की, चित्रांच्या जतनासाठी स्वतंत्र तरतूद केलेली नाही हे खरे आहे; पण देखभालीसाठीच्या व्ययातून चित्रांच्या जतनाचे काम करता येईल. त्यासाठी निधी अल्प पडणार नाही.