प्रेमळ आणि परेच्छेने वागून सासरी सर्वांची मने जिंकणार्‍या अलोरे (चिपळूण) येथील साधिका सौ. भक्ती नितीन चव्हाण !

अलोरे (चिपळूण) येथील सौ. भक्ती नितीन चव्हाण यांचा २६.३.२०२१ (फाल्गुन शुक्ल पक्ष त्रयोदशी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. भक्ती चव्हाण यांना सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

१. श्री. नितीन चव्हाण (पती), सनातन आश्रम, देवद, पनवेल. 

१ अ. प्रेमभाव : ‘सौ. भक्ती घरी येणार्‍या सर्व पाहुण्यांचे आणि घरातील सर्वांचे प्रेमाने करते.

१ आ. आसक्ती नसणे : भक्तीला कशाचीच, कपडे, दागिने, नातेवाईक इत्यादींची आसक्ती नाही. ती आवश्यक तितकेच कपडे विकत घेते. माझ्या वडिलांनी तिच्यासाठी मोत्यांचा हार आणला होता. तेव्हा तिने ‘नको’, म्हणून सांगितले.

१ इ. स्वाभिमानी : ‘आपण साधनेसाठी आश्रमात रहातो, तर घरात कुणाकडे आई-वडिलांकडे पैसे मागायचे नाहीत, ‘कुणाकडे हात पसरायचे नाहीत’, अशी तिची वृत्ती आहे.

१ ई. परिस्थिती स्वीकारून पतीला पूर्णवेळ सेवा करण्याची अनुमती देणे : आम्ही ४ भाऊ वेगळे झालो. तेव्हा मी मोठा असल्याने ‘मी माझ्या आई-वडिलांना सांभाळावे’, असे सगळ्यांनी सांगितले. भक्तीने ते स्वीकारून मला आश्रमात रहायला सांगितले आणि ती घरी राहून प्रसारातील सेवा करून माझ्या आई-वडिलांना सांभाळत आहे. माझी साधना व्हावी, यासाठी तिने मला पूर्णवेळ सेवा करण्याची अनुमती दिली. तिने परेच्छेने वागून आज्ञापालन केले. घरातील विरोध स्वीकारूनही ती आनंदी रहाते.

‘भक्ती’ नावाप्रमाणेच आहे तिची गुरूंवर दृढ भक्ती ।

सहचारिणी मिळाली मजला नाव तिचे ‘भक्ती’ ।
नावाप्रमाणेच आहे तिची गुरूंवर दृढ भक्ती ॥ १ ॥

साधनेतील दृष्टीकोन आहेत तिचे स्पष्ट ।
म्हणून असते ती नेहमी साधनेत व्यस्त ॥ २ ॥

घरी रहाणे स्वीकारले तिने माझी साधना व्हावी म्हणून ।
अन् जिंकले गुरूंचे मन सासू-सासर्‍यांची सेवा करून ॥ ३ ॥

शीघ्र गतीने व्हावी भक्तीची प्रगती ।
अशी गुरुचरणी शरणागतीने प्रार्थना करतो ॥ ४ ॥

२. सौ. सुषमा मोरे (सौ. भक्तीची आई), ठाणे

२ अ. हळवा आणि काळजी घेण्याचा स्वभाव : सौ. भक्ती मनाने हळवी आहे. तिला मोजक्याच मैत्रिणी होत्या. त्यांच्याशी तिचे चांगले जमायचे. ती कधी कुणाला उलट बोलत नाही. सर्वांची काळजी घेण्याची तिची वृत्ती आहे.

२ आ. गाडीचा अपघात झाल्यावर कुणीतरी पाणी शिंपडून ते पिण्यासाठी देणे, ‘ती व्यक्ती पांढरे कपडे घातलेली अन् धोतर नेसलेली आहे’, असे दिसणे अन् त्या वेळी देवानेच सांभाळल्याचे लक्षात येणे : वर्ष १९८१ मध्ये चि. मीना (सौ. भक्तीचे पूर्वाश्रमीचे नाव) ७ मासांची असतांना आम्ही अलिबागला जात होतो. समवेत माझी अडीच वर्षांची मोठी मुलगी कु. दीपाही होती. वाटेत तळोजा येथे आमच्या गाडीचा अपघात झाला. त्या वेळी आम्हाला केवळ मुका मार लागला. या दोन्ही मुलींना काहीच लागले नाही. थोड्या वेळाने थोडे भानावर आल्यावर आम्हाला कुणीतरी पाणी शिंपडून ते पिण्यासाठी दिले. तेव्हा ‘ती व्यक्ती पांढरे कपडे घातलेली आणि धोतर नेसलेली आहे’, असे मला दिसले. नंतर मात्र मला ती व्यक्ती दिसली नाही. या प्रसंगात चि. मीनाला देवानेच सांभाळले.

३. सौ. दीपा कदम (मोठी बहीण), बोरीवली, मुंबई.

३ अ. बहीण म्हणजे देवाने दिलेली सर्वांत मोठी भेट असून मनातील सर्व गुपिते तिला ठाऊक असणे : ‘बहीण म्हणजे देवाने दिलेली सर्वांत मोठी भेट असते. आपल्या मनातील सर्व गुपिते तिला ठाऊक असतात. आईसारखी काळजी घेणारी, काही चुकल्यास रागावणारी आणि प्रेमाने समजून घेणारी बहीणच असते. आज तिचा वाढदिवस आहे. ! होळीच्या दिवसांमधला तिचा जन्म ! ज्याप्रमाणे होळीमध्ये दुष्ट, वाईट प्रवृत्ती, तसेच अमंगळ विचार यांना नष्ट करून चांगली वृत्ती आणि चांगले विचार अंगी आणले जातात, त्याप्रमाणे तू आमच्या सगळ्यांमधील वाईट गोष्टी मागे टाकून चांगला विचारच करत आलीस.

३ आ. साधनेमुळे भक्तीत पुष्कळ पालट होणे आणि ती सासरी सर्वांची लाडकी सूनबाई होणे : लहानपणी भक्तीचा स्वभाव थोडासा चिडचिडा होता; मात्र आता साधनेमुळे तिच्यात पुष्कळ पालट झाला आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही. आज ती सासरी सर्वांना सांभाळून रहाते, हे तिचे कौतुक आहे; म्हणूनच ती सासरी सर्वांची लाडकी सूनबाई आहे.

३ इ. हसत-खेळत आणि न भांडता गेलेले बालपण : आम्ही चार भावंडे ! लहानपणी धमाल करत एकत्र खेळत कधी मोठे झालो, हे कळलेसुद्धा नाही. लहानपणी भावंडांमध्ये थोडीफार तरी भांडणे होतात; पण आमच्यात कधी मतभेदसुद्धा झालेले मला आठवत नाहीत. भक्तीची लहानपणची एक आठवण म्हणजे भातुकली खेळतांना ती भाजी आणायला खरोखरंच एकटीच मंडईत गेली होती. तेव्हा आई-वडिलांनी पुष्कळ शोधाशोध केली होती.

३ ई. सहनशील आणि शांत स्वभाव : सौ. भक्ती पुष्कळ सहनशील आणि शांत आहे. तिचा हा स्वभाव मला विशेष भावतो. तिचा एक विशेष गुण म्हणजे एखाद्या विषयावर वाद होत असतील, तर वाद न करता विषय मागे टाकून हसत पुढे जाणे.

३ उ. ‘माझी मावशी म्हणजे दुसरी आईच आहे’, असे भक्तीच्या भाचीने सांगणे : माझ्या बाळंतपणामध्ये तिने मला पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे माझी मुलगी कु. दुर्वा हिची ती लाडकी मावशी आहे. दुर्वा म्हणते, ‘‘माझी मावशी माझी दुसरी आईच आहे.’’

भक्तीला उत्तम सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभो, तिची अध्यात्मात प्रगती होवो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक