सोलापूर येथील मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट !
स्फोटादरम्यान दोघांचा मृत्यू; मात्र रुग्णालयाने फेटाळला कुटुंबियांचा आरोप
सोलापूर – येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एका ऑक्सिजन टाकीचा २४ मार्चच्या रात्री स्फोट झाला. अग्नीशमन दलाने तातडीने ही आग आटोक्यात आणली. हा स्फोट झाल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक रुग्ण नैसर्गिकरित्या मरण पावला असून दुसरी व्यक्ती रुग्णाला भेटण्यास आली होती, असे रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले; मात्र हनुमंत क्षीरसागर यांच्या मृत्यूस सर्वस्वी रुग्णालय प्रशासन उत्तरदायी असल्याचा आरोप मृत हनुमंत क्षीरसागर यांच्या कुटुंबियांनी केला आहे. यावर मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले की, हनुमंत क्षीरसागर ही व्यक्ती रुग्णाला भेटण्यासाठी आली होती; मात्र आमच्या रुग्णालयात भरती नसल्याने तिच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर लक्षात येईल, तर दुसरा रुग्ण सुनील लुंगारे हे कोरोनाबाधित होते. त्यांच्यावर उपचार करूनही त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याचा संबंध ऑक्सिजनच्या टाकीच्या स्फोटाशी नाही.