लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे असलेले आणि अन्यायाविरुद्ध चीड असलेले देवद आश्रमातील सनातनचे संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८५ वर्षे) !

सनातनचे संत पू. दत्तात्रेय देशपांडे यांच्या जीवनप्रवासातील एक कटू आणि संघर्षमय प्रसंग

पू. दत्तात्रेय देशपांडे

१. धर्माचरणाची आवड

१ अ. घरी पुष्कळ देवधर्म केला जात असणे, नवरात्र बसवण्यासाठी घरी येणार्‍या पुरोहितांकडून देवपूजा आणि त्यासाठी लागणारे मंत्रजप, तसेच वेदांमधील काही भाग स्वरांसहित शिकणे : ‘मी १३ वी (इंटर सायन्स) अनुत्तीर्ण झाल्यावर १ वर्ष घरी खेडेगावातच होतो. आमच्या घरी आमची काकू पुष्कळ देवधर्म, उपवास आणि व्रत-वैकल्ये करायची. त्या वेळी शारदीय नवरात्रीचे पूजाविधी करायला एक पुरोहित (शास्त्री) १० दिवस परगावाहून आमच्याकडे निवासाला यायचे. ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायचे. मी त्यांच्याकडून देवपूजा आणि मंत्रपठण यांसाठी वेदांमधील काही भाग स्वरांसहित शिकून घेऊन पाठ केले होते. त्या समवेतच विधिवत् पूजा करण्याचे मंत्र लिहून घेऊन तेही मुखोद्गत केले होते. त्यांच्याकडून मंत्रांसहित पूजा करण्याचे प्रात्यक्षिकही शिकून घेतले होते. ते पुरोहित आपल्या गावी निघून गेल्यावर मी नियमित पूजा करत असे. त्याप्रमाणे पूजा करायला मला २ घंटे लागत असत.

१ आ. पुराणांचे वाचन करणे : या व्यतिरिक्त मी काकूच्या आवडीच्या पुराणांचे आणि काही आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करायचो, उदा. १. चिदंबर महात्म्य, २. श्री गुरुचरित्र, ३. श्री नवनाथ पोथी, ४. श्री गजानन विजय, ५. दासबोध, ६. हरिविजय, ७. श्रीमद्भगवद्गीता, ८. शिवलीलामृत इत्यादी.

१ इ. प्रतिदिन संध्याकाळी भजने, आरत्या, शेजारती आणि प्रदक्षिणा म्हणणे : मी प्रतिदिन संध्याकाळी नरसोबाची वाडी येथील ‘दत्त’ या पुस्तकातून भजने, आरती, क्षमास्तोत्रे, शेजारती, प्रदक्षिणा हे सर्व म्हणत असे. माझी आई आणि काकू या निरक्षर असल्यामुळे त्यांची केवळ श्रवणभक्ती होती. वडीलही केवळ ३ वर्ग शिकले होते. माझे वडील सहनशील वृत्तीचे होते.

१ ई. जिज्ञासेपोटी टपालाने काही लघुग्रंथ मागवून घेऊन ते वाचणे : त्या काळी मी जिज्ञासेपोटी ३ रुपयांत पुण्याहून रामराज्य परिषद प्रकाशनचे टपालाने १२ लघुग्रंथ मागवून घेऊन ते वाचले होते, उदा. १. यज्ञोपविताचे रहस्य, २. शिखा (शेंडी) का ठेवावी ?, ३. मंदिर प्रवेशाचा शास्त्रार्थ इत्यादी.

२. अभ्यासू वृत्ती

विधीनियम (कायदा) जाणून घेण्याच्या तीव्र तळमळीमुळे मी मुंबईहून ‘कुळकायदा’ याविषयी इंग्रजी भाषेतील पुस्तिका टपालाने मागवली होती आणि ती प्राप्त झाल्यावर त्या संपूर्ण पुस्तिकेचा मी अभ्यासही केला होता.

३. मुलीला कीर्तन आणि संगीताची आवड असणे अन् तिला त्यासाठी प्रोत्साहन देतांना अनेक सुप्रसिद्ध गायकांचे गायन ऐकण्याची संधी मिळणे

माझ्या दोन नंबरच्या मुलीला गणिताची आवड नव्हती; म्हणून मी तिला ‘कला’ हा विषय घेण्यास सांगितला. तिने १० वीनंतर महाविद्यालयात ‘संगीत’ हा विषय घेतला. तिला संगीताची परीक्षा देण्यासाठी शिकवणी लावून दिली. त्यानंतर तिने पदवीधर झाल्यावर आळंदीला कीर्तन महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला होता. त्या कालावधीत एकदा नागपूरला कीर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘तेथे तिला रेल्वेने घेऊन जाणे आणि परत आणणे’, हे सर्व मी नोकरी सांभाळत केले.

त्या वेळी अनेक संगीत कलाकारांच्या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहिलो होतो, उदा. १. भीमसेन जोशी, २. बसवराज राजगुरु, ३. छोटा गंधर्व, ४. वसंतराव देशपांडे, ५. प्रकाश संगीत, ६. अजित कडकडे इत्यादी. शेवटी तिला २ – ३ ठिकाणी कीर्तन करण्याची संधीही मिळाली होती. त्यात ती यशस्वीही झाली. त्यानंतर तिचे लग्न झाले.

४. नोकरीतील कटु अनुभव

४ अ. रेल्वेमध्ये लिपिकाची नोकरी करणे : वर्ष १९६१ मध्ये मी रेल्वेच्या कार्यालयातील व्यापार विभागात लिपिक म्हणून रुजू झालो. त्या वेळी मला १२० रुपये मासिक भत्ता मिळत होता, तर वर्षाला (मूळ पगारात) ४ रुपये बढती (इंक्रिमेंट) मिळत असे. वर्ष १९९३ मध्ये निवृत्त होतांना मला ४ सहस्र रुपये वेतन होते.

४ आ. नोकरीत झालेला अन्याय आणि त्याविरुद्ध केलेला संघर्ष

४ आ १. तिकिटांच्या अपहाराचा खोटा आरोप ठेवला जाऊन पन्नास दिवसांसाठी नोकरीतून निलंबित करणे : मी चाकरी करत असतांना दारुडे, मध्यम आणि उच्च अधिकारी यांच्या आर्थिक संबंधाने षड्यंत्र रचून माझ्यावर २ सहस्र रुपयांच्या तिकिटांच्या अपहाराचा खोटा आरोप सिद्ध केला गेला. तेव्हा मला ५० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. मी विनंती केल्यावर मला कामावर घेतले; मात्र आरोपपत्र तसेच ठेवले.

४ आ २. एकतर्फी निर्णय होऊन वेतनातून प्रतिमास दीडशे रुपये कापण्यात येणे : मी त्यावर ‘अपील’ केले. त्याचे उत्तर ४ मासांनी मिळाले. त्यात ‘नरो वा कुंजरो वा’ अशा आशयाचे संदिग्धतेने काहीतरी लिहिले होते. त्यात ‘तुम्हाला न्याय हवा असेल, तर योग्य शब्दांत पुनः ‘अपील’ करा’, असे लिहिले होते. त्यामुळे मी चिडलो. तोपर्यंत एकतर्फी निर्णय घेण्यात येऊन योग्य चौकशी न करताच माझ्या वेतनातून प्रतिमास १५० रुपये कापले जाऊ लागले.

४ आ ३. शासनाविरुद्ध खटला भरणे : पुष्कळ प्रयत्न करूनही मला कुठेच न्याय मिळेना. शेवटपर्यंत मला कुणीच साहाय्य केले नाही. अखेर नाईलाजास्तव मी शासनाविरुद्ध न्यायालयात (सिव्हील सूट) खटला भरला. नंतर १ – २ वर्षांनी तो खटला केंद्रीय कर्मचारी लवादाकडे स्थानांतरित झाला. त्यानंतर मला नवी मुंबईत वाशी येथे प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले.

४ आ ४. खटला चालवण्यास अल्प पैशांत एकही अधिवक्ता न मिळणे, अधिवक्ता असलेल्या रेल्वेतील एका माजी कर्मचार्‍याने अल्प पैशांत खटला लढवण्याचे मान्य करणे, निकालात न्यायालयाने दोषारोप रहित करणे; परंतु हानीभरपाई न देणे : तेव्हा मी देवाला पुष्कळ प्रार्थना केल्या आणि मंत्रपठणही केले. नंतर ठरलेल्या दिवशी मी वाशी येथे उपस्थित झालो. मी संपूर्ण मुंबई पालथी घातली, तरी मला अल्प पैशांत एकही अधिवक्ता मिळाला नाही. रेल्वे खात्यातील एक माजी कर्मचारी अधिवक्ता झाला होता. देवाच्या कृपेने त्याने केवळ ५०० रुपयांत माझा खटला लढवण्याचे मान्य केले. त्यानंतर पुन्हा मी वर्धा येथे घरी गेल्यावर संपूर्ण खटल्याची माहिती टंकलिखित करून त्या अधिवक्त्याकडे पाठविली. त्यानंतर ३ – ४ वर्षांनी मला न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाली. त्यातही पुनः ‘नरो वा कुंजरो वा’, असेच होते. ‘सर्व दोषारोप रहित केले आहेत आणि व्यवस्थापनाची इच्छा असेल, तर पुन्हा चौकशी करून आरोप सिद्ध करू शकता’, असे त्यात वाक्य घातले होते. न्यायालयाने मला हानीभरपाई दिली नाही.

४ आ ५. निलंबनाच्या वेळचे आणि रोखलेले वेतन मिळण्यासाठी प्रयत्न करूनही ते न मिळणे : माझी अडीच वर्षांची वेतनवृद्धी रोखली होती. ती मला मिळाली; परंतु ‘रोखलेले पैसे, जुना हिशोब आणि निलंबनाच्या वेळचे वेतन’ यांचा विचार करायला कुणीच सिद्ध नव्हते. आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटलो; परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. सर्व ठिकाणी केवळ ‘हो, करतो’, एवढेच सगळे म्हणायचे. मी त्यासाठी स्वतःचा वेळ घालवून हेलपाटे मारले; परंतु फलनिष्पत्ती काहीच नव्हती. न्यायालयाने निर्णय देऊनही त्यावर सांगितलेल्या कालावधीत कार्यालयाकडून निर्णय झाला नव्हता. त्याला विलंब झाला होता. यासाठी मी न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका प्रविष्ट करणे अपेक्षित होते; पण मी तेथे न्यून पडलो. असे करता करता माझ्या निवृत्तीची वेळ येऊन ठेपली.

४ आ ६. निवृत्ती वेतनातही चुका होणे : निवृत्ती वेतन ठरवतांना माझ्या सेवेच्या कालावधीचे संपूर्ण दिवस धरणे अपेक्षित होते; परंतु माझ्या निलंबनाचे दिवसही सेवेत धरले होते. त्यामुळे निवृत्ती वेतनात १४ रुपयांचा फरक पडला. (ते अल्प मिळाले.) त्यामुळे पुन्हा अधिवक्ता आणि न्यायालय येथे हेलपाटे घालावे लागले. या कामासाठी मला नागपूर, वाशी, वर्धा आणि पुन्हा वर्धा येथे एकूण ४ ठिकाणी अधिवक्ता नियुक्त करावे लागले. निवृत्तीनंतर अखेर ४ थ्या अधिवक्त्याकरवी लवकर काम झाले.

नोकरीच्या आरंभी घेतलेली अनामत रक्कमही (३०० रुपये) मला (विनाव्याजही) मिळाली नाही. मला माझे शासनाकडे इतके दिवस राहिलेल्या पैशांचे १२ टक्क्यांनी व्याज हवे होते. तेही मला मिळाले नाही. तेव्हा अधिवक्तेही त्यांच्या कामाशी अप्रामाणिक असतात, असे मला वाटते.

५. या कालावधीत जाणवलेली सूत्रे

अ. अधिकारीवर्गही त्यांच्या कर्मचार्‍यांपुढे दबून असतात.

आ. न्यायाधीशही कर्मचार्‍यांकडे साशंक दृष्टीने पहातात.

इ. न्यायाधिशांची शासनाकडे पहाण्याची दृष्टी सौम्य अन् सहानुभूतीची असते.

या कठीण काळात देवानेच मला साहाय्य केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृपाशीर्वाद आणि श्रीकृष्णाची कृपादृष्टी यांमुळे मी एकटा असूनही जिंकलो. त्याचे श्रेय मी त्यांनाच अर्पण करतो.’

– (पू.) श्री. दत्तात्रेय देशपांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१०.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक