‘धर्मनिरपेक्ष’ लाचारी !
हिंदूंचे सण आले की, त्यासमवेत हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे प्रयत्न होणे, हे आता समीकरण झाले आहे. वर्षभर झोपून राहिलेली पुरोगामी मंडळी या वेळी मात्र जागी होऊन हिंदूंचे सण, चालीरिती, प्रथा-परंपरा या कशा प्रकारे जुन्या-पुराण्या आणि बुरसटलेल्या आहेत, हे सांगण्यात धन्यता मानतात किंवा सणांच्या माध्यमातून ‘हिंदु’ समाजमनावर फसव्या ‘धर्मनिरपेक्षते’चा संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुरोगामीपणा म्हणजे ‘सेक्युलर’वादाच्या संदेशान्वये हिंदुविरोध’, असे म्हणण्यात काही अडचण नाही. पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणे जणू एक ‘फॅशन स्टेटमेन्ट’ झाले असून अशांना समाजात आदराने पाहिले जाते, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. अर्थात् यास समाजाची विकृत मानसिकता कारणीभूत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावीच हिंदु समाज अशा मंडळींचे कोडकौतुक करतो किंवा त्याला आपला इतिहास आणि ओळख यांना विरोध करणे अथवा विरोध करणार्यांची ‘री’ ओढणे सयुक्तिक वाटते. काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ ‘कॉन्व्हेंट’मध्ये शिकणार्या पिढीपर्यंत ही विचारसरणी मर्यादित होती; परंतु आता स्थानिक भारतीय भाषेत शिक्षण घेणार्यांचीही काहीशी अशीच गत झाली आहे, हे दुर्दैवी आहे. विचारधारेत होत गेलेल्या या पालटामागे पुष्कळ मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे. त्यामुळे या ‘स्लो पॉयझन’सम षड्यंत्राला हिंदूंनी विरोध करायला हवा; परंतु तसे होतांना दिसत नाही. दुसरीकडे याचा परिणाम असा होतो की, शिकल्या सवरलेल्या हिंदुत्वनिष्ठांना व्याख्याने, मोर्चे, सोशल मिडिया, प्रसारमाध्यमे यांवर स्वत:ला ‘अनअपोलोजेटिक हिंदु’ म्हणजे ‘हिंदु असल्याविषयी आम्हास लाज नाही, तर अभिमान आहे’, अशा प्रकारे बोलावे, लिहावे आणि सांगावे लागते. यातूनच बहुतांश हिंदु समाजाचे किती वैचारिक अध:पतन झाले आहे, हे लक्षात येते.
गुणवंत अल्पसंख्य !
आता येऊ घातलेल्या होळीचाच विषय पहा. सध्या वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमे यांवर एक विज्ञापन गाजत आहे. यात एका मुसलमान युवतीला होळीच्या दिवशी तिचा हिंदु मित्र रंग लावण्यासाठी येतो. बुरखाधारी युवती कोणताच विचार न करता डोक्यावरील तिचा बुरखा काढून खाली टाकते आणि मित्राकडून रंग लावून घेते. यामध्ये दोघे एकमेकांना भगवा आणि हिरवा रंग लावत असल्याचे दाखवले आहे. या विज्ञापनातून अल्पसंख्य समुदाय किती व्यापक, मनमिळाऊ आणि सहिष्णु आहे, हे ध्वनित होते. अशा सूक्ष्म विचार प्रसृत करणार्या ‘माईंड गेम्स’मुळेच हिंदू एका अतार्किक मानसिक दुरवस्थेत फेकले जातात. गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव सोडा; पण गावातील एखाद्या स्थानिक धार्मिक उत्सवात धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांवरून हिंदूंची मिरवणूक गेली आणि चुकून तिथे गुलाल उडाला, तरी दंगली भडकल्याची असंख्य उदाहरणे गेल्या ७० वर्षांचा इतिहास चाळल्यास आढळतील. त्यामुळे अशा प्रकारे वस्तूस्थितीला दुर्लक्षित करून तथ्यहीन विज्ञापने बनवली जात आहेत किंबहुना त्यातून कथित ‘हिंदू-मुसलमान एकते’चा आत्मघाती संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा दुहेरी अपलाभ उठवला जातो. एक असा की, हिंदूंना न्यून लेखणे आणि दुसरे की, अहिंदु किती श्रेष्ठ मानसिकतेचे असतात, हे दाखवून देणे. अशा उदाहरणांतून एवढ्या गुणवंत अल्पसंख्यांकांवर देशातील बहुसंख्य हिंदू हे शस्त्र उगारतात, त्यांचे ‘लिंचिंग’ (जमावाने एखाद्या व्यक्तीला मरेपर्यंत मारहाण करणे) करतात, अशा प्रकारे गरळओक करण्यासाठीची भारतीय ‘ज्ञानी’ उपटसुंभांची आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’, ‘हफिंग्टन पोस्ट’सारख्या पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांतील हिंदुद्वेष्ट्या मंडळींची लेखणी मोकळी ! असो.
आधुनिक रझाकार ?
या पद्धतीने हिंदु सणांविषयी संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न प्रशासकीय स्तरावरूनही केले जात आहेत, हे अधिक गंभीर सूत्र आहे. नुकतेच उत्तरप्रदेशचे फरुखाबाद शहर दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी ‘होळी हा मद्यपान आणि अमली पदार्थ सेवन करण्याचा उत्सव आहे’, असे संतापजनक विधान केले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी होळी साजरी करण्यावर अनेक ठिकाणी निर्बंधही लादण्यात आले आहेत. हे योग्य असले तरी, याच कालावधीत काही राज्यांत येऊ घातलेल्या निवडणुकीच्या सभा मात्र बिनबोभाटपणे चालू आहेत. ‘हे चुकीचे नाही’, असे काही हिंदू म्हणत आहेत. सध्या काही राज्यांमध्ये निवडणुकांचा प्रसार चालू असून सर्वच राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या सभांचे आयोजन केले जात आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळी एकत्रित यायचे नाही, असे सांगणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन अशा सभांवर निर्बंध घालण्याचा विचारही करत नाहीत. हिंदु समाज हा नेहमीच सामंजस्याची भूमिका अंगीकारून कोरोनावर चाप बसवण्यासाठी होळीवरील निर्बंध निमूटपणे स्वीकारील; पण राजकीय पक्षांकडून सर्व नियमांचे उल्लंघंन करून चालू असलेल्या राजकीय प्रसाराचे काय ? अशांवर कारवाई होतांना दिसत नाही.
येथे नेहमीप्रमाणे हिंदूंना प्रशासकीय स्तरावरून सापत्नपणाची वागणूक पहायला मिळते, हेही विसरता कामा नये. कोरोनाचा संसर्ग पहाता महाराष्ट्रात प्रशासनाने होळीच्या दिवशी म्हणजे २८ मार्चला ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणासंबंधी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या माध्यमातून सर्व मशिदींमध्ये कोरोनाच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेत सण साजरा करण्याची ‘विनंती’ करण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांच्या समोरील प्रशासनाची ही ‘लाचारी’ची भूमिका हिंदु सणांच्या विरोधात मात्र काठी उगारण्यास सिद्ध असते. प्रशासनानेच ‘होळी साजरी करू नये’, अशा प्रकारे आदेश काढले आहेत. एखादा बुद्धीवादी म्हणेल की, हिंदू हे बहुसंख्यांक असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन होळी साजरी केली, तर कोरोनाचे संक्रमण गतीने पसरेल. जर तसे असेल, तर अल्पसंख्यांक समाजातील सणांचा विचार करता हा समाज हिंदूंच्या कितीतरी पटींनी त्यांची प्रार्थनास्थळे आणि तेथील जागा अपुरी पडत असल्याने रस्तेच्या रस्ते अडवून स्वतःचे सण साजरे करण्याची दृश्ये उभ्या भारताने पाहिली आहेत. त्यामुळे हा युक्तीवाद लंगडा असून यातून प्रशासकीय स्तरावरील ‘धर्मनिरपेक्ष लाचारी’ नि आधुनिक रझाकारी वृत्तीचा प्रत्यय येतो, हेच खरे !
या हिंदुविरोधी म्हणजेच गांधीगिरी विचारांची ‘होळी’ करण्याची आता वेळ आली आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेत प्रभावी हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.