धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची दुर्ग मावळा प्रतिष्ठानची मागणी
सावंतवाडी – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट सांगणारा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, या मागणीचे निवेदन दुर्ग मावळा प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी आणि संबंधित अन्य अधिकारी यांना देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा कोकण विभाग सहभागी झाला आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भावी पिढी स्वाभिमानी, सामर्थ्यवान, बलशाली, कुशाग्र, अष्टावधानी अशा छत्रपती संभाजी महाराजांसारखी होईल. यासाठी शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ४ थी, इयत्ता ७ वी आणि इयत्ता ९ वी या इयत्तांच्या इतिहास विषयात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील पाठ समाविष्ट करावा. स्वराज्य रक्षक संभाजीराजेंचा इतिहास वर्गावर्गात शिकवून नवीन पिढीसमोर एक अष्टावधानी आणि चारित्र्यसंपन्न आदर्श ठेवावा, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकार्यांसह ‘बालभारती’चे संचालक यांनाही निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी संघटनांनी वरील मागणीची अधिकाधिक निवेदने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, तसेच dir.balbharati@mahedu.gov.in या ‘ईमेल’वर ‘बालभारती’च्या संचालकांना पाठवावी, असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. गणेश नाईक यांनी केले आहे.