परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

  • महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये मागितल्याचे प्रकरण

  • मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश

परमबीर सिंह आणि अनिल देशमुख

नवी देहली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने सिंह यांना याविषयी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तसेच ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असतांना त्यांना पक्षकार का केले नाही ?’  अशी विचारणाही न्यायालयाने सिंह यांना केली. ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये प्रतिमहा वसूल करून देण्याविषयी केलेल्या मागणीची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी सिंह यांनी या याचिकेत केली होती.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेले स्थानांतर रहित करावे, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सिंह यांच्या वतीने अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद करतांना म्हटले, ‘मुंबई पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेले स्थानांतर हा दुर्मिळ प्रकार आहे.’ त्यावर न्यायालयाने म्हटले, ‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’