पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्गदूत फाऊंडेशन’ची स्थापना ! – राहुल चिकोडे, भाजप
कोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) – सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे प्राणवायूचे प्रमाण अल्प होत आहे. पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण यात सातत्याने वाढ होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. या विषयासाठी प्रत्येकाने स्वत:चे दायित्व म्हणून याकडे पाहिले पाहिजे. तरी पर्यावरणपूरक शहराच्या निर्मितीसाठी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘निसर्गदूत फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रमोद पाटील, निसर्गमित्र अनिल चौगुले, योगेश चिकोडे, शंतनू मोहिते, भार्गव परांजपे, सुमित पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
राहुल चिकोडे या वेळी म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात ३०० हून अधिक ‘फाऊंड्री’ असून या परिसरात अशोक, चिंच, आवळा यांसह अनेक झाडे लावण्यात येणार आहेत. शहरात प्लास्टिकमुक्तीसाठी पर्याय म्हणून कापडी पिशव्या, खादीचा वापर करण्यात प्रोत्साहित करणे अशा गोष्टी करण्यात येतील. संस्थेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी अधिक प्राणवायू उत्सर्जन करणारी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. ‘पाणी वाचवा’ या संकल्पनेतून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी जनजागृती करणे, तसेच पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’’
या वेळी ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’चे प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश पोचवण्यासाठी प्रत्येक शाळेतील ५० विद्यार्थ्यांना या संदर्भातील विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘ट्रेकिंग’ला गेल्यावर आज आम्हाला डोंगर झाडांअभावी बोडके दिसतात. त्यामुळे वनऔषधीही लुप्त होत आहेत. तरी तेथेही झाडे लावणे अत्यावश्यक आहे.’’