सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेच्या वेळी कु. शर्वरी कानस्कर आणि तिची आई सौ. अनुपमा कानस्कर यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

१. कु. शर्वरी कानस्कर

१ अ. ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेत भाग घेतांना ही सेवा गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायची असून ती सेवाभावाने करायची आहे’, असा भाव असणे : ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेत मला ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून भाग घेण्याची संधी मिळाली आहे’, असे कळले. तेव्हा माझे मन एकदम उत्साही झाले. या नृत्य स्पर्धेत भाग घेतांना ‘या स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळवायचा आहे’, असा विचार माझ्या मनात नव्हता. केवळ ‘मी ही सेवा गुरुदेवांच्या चरणी अर्पण करणार आहे आणि मला ती सेवाभावाने करायची आहे’, असा भाव माझ्या मनात होता. नृत्य करण्यासाठी गाण्याची निवड झाल्यावर मी त्यावर नृत्याचा सराव करायला आरंभ केला. तेव्हाही ‘हे नृत्य मला गुरुदेवांसाठी करायचे आहे आणि त्यासाठीच मी सराव करत आहे’, असे मला वाटत होते. एकदा नृत्याचा सराव करतांना मला ‘माझे नृत्य बघायला बाळकृष्ण आला आहे आणि तो बसून माझे नृत्य बघत आहे’, असे जाणवले.

१ आ. गुरुदेवांच्या कृपेने चित्रीकरणासाठी शाळेचे सभागृह उपलब्ध होणे : नृत्याचे चित्रीकरण करण्यासाठी आम्हाला सभागृह हवे होते; पण दळणवळण बंदीमुळे ते मिळणे कठीण होते. तेव्हा देवाने मला सुचवले, ‘माझ्या शाळेतही एक मोठे सभागृह आहे.’ त्यानुसार आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारल्यावर त्यांनी आम्हाला लगेच ते सभागृह चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले. ही गुरुदेवांचीच कृपा होती.

१ इ. नृत्याच्या चित्रीकरणासाठी सिद्धता करतांना जाणवलेली सूत्रे

१. नृत्यासाठी माझी सिद्धता करतांना मला ‘मी आश्रमातल्या शृंगारकक्षात सिद्धता करत आहे’, असे वाटले.

२. ही सिद्धता करतांना ‘गुरुदेवांना अपेक्षित असेच मला सजता येऊ दे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती.

३. नृत्यासाठी सिद्धता करतांना मी प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन हळू आवाजात लावायचे. तेव्हा माझे मन शांत आणि स्थिर व्हायचे.

कु. शर्वरी कानस्कर

४.‘या नृत्याचे चलत्चित्र (व्हिडिओ) प्रत्यक्ष देवच पहाणार आहे’, असा माझा भाव होता.

५. नृत्याचे चित्रीकरण करतांना ‘गुरुदेवांनी पार्श्‍वभूमीच्या रंगापासून ते प्रकाशाची रचना कशी करावी ?’, येथपर्यंतची सर्व सूत्रे शिकवली आहेेत’, असे माझ्या लक्षात आले.

१ ई. गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑडिशन राऊंड’मध्ये भाग घेतलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांच्या नृत्याच्या चलत्चित्रांना पुष्कळ चांगले अभिप्राय आले.

१ उ. कु. अंजली कानस्कर हिची उपांत्य फेरीसाठी निवड होणे, उपांत्य फेरीसाठी निवडलेल्या वीर आणि रौद्र रसप्रधान गाण्यावर ती नृत्याचा सराव करतांना घरात उष्णता जाणवणे : स्पर्धेतील उपांत्य-पूर्व फेरीसाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिका कु. अपाला औंधकर आणि कु. अंजली कानस्कर यांची निवड झाली. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. उपांत्य-पूर्व फेरीमध्ये ताईला (कु. अंजली कानस्कर हिला) नवरसातील कुठल्याही एका रसावर नृत्य बसवायचे होते. तेव्हा आम्ही वीर आणि रौद्र रसप्रधान नृत्य बसवायचे ठरवले. ताईचा या नृत्याचा सराव चालू असतांना काही वेळेला घरी वातावरणात उष्णता जाणवायची. तिचे नृत्य भावपूर्ण आणि गुरुदेवांना अपेक्षित असे होण्यासाठी आम्ही भावाच्या स्तरावर प्रयत्न वाढवले. त्यासाठी गाणे लावून केवळ हातांच्या हालचाली करून त्यात भाव आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे ताईला नृत्य करतांना गुरुदेवांना अपेक्षित असा भाव ठेवता आला.

– कु. शर्वरी कानस्कर, दुर्ग, छत्तीसगड.(२.२.२०२१)

. सौ. अनुपमा कानस्कर यांना स्पर्धेच्या वेळी जाणवलेली सूत्रे

सौ. अनुपमा कानस्कर

२ अ. ‘मुलींचे नृत्य बसवून घेतांना गुरुदेवांच्या चरणी ‘आपल्याला अपेक्षित असेच नृत्य बसवून घेता येऊ दे’, अशी प्रार्थना होत होती.

२ आ. स्पर्धेच्या काळात नवरात्री असल्यामुळे ‘अंजलीसाठी देवीचे आणि शर्वरीसाठी कृष्णावरील आनंद व्यक्त करणारे, अशी गाणी निवडावी’, असे वाटणे : नृत्यासाठी गाणे निवडतांना ‘नवरात्र चालू असल्याने सात्त्विक गाण्यांची निवड करावी. शुद्ध कथ्थकच्या ऐवजी देवीचे स्तुतीपर नृत्य बसवावे. अंजलीसाठी देवीची ‘मारक शक्ती’ दर्शवणारे नृत्य आणि शर्वरीसाठी आनंद अन् भाव व्यक्त होणारे ‘कृष्णाष्टकम्’ हे गाणे निवडावे’, असे विचार माझ्या मनात आले.

२ इ. सहशिक्षकांनी व्यावसायिक चित्रीकरण करणार्‍यांशी जोडून दिल्यामुळे नृत्याचे चित्रीकरण सहजपणे आणि चांगले होणे : माझ्या नृत्य वर्गातील एका शिक्षकांनी आम्हाला एका व्यावसायिक चित्रीकरण करणार्‍या व्यक्तीची भेट करून दिली. त्यामुळे आम्हाला सहजतेने त्यांच्याकडून नृत्याचे चित्रीकरण करून मिळाले आणि ते चित्रीकरण चांगले अन् व्यवस्थितही झाले. या सर्व गोष्टी केवळ एक भ्रमणभाष केल्यावर लगेच झाल्या. त्या वेळी जणू ‘हे गुरुदेवांचेच नियोजन होते. त्यांनीच आम्हाला साहाय्यक शिक्षकांना भ्रमणभाष करण्याची बुद्धी दिली’, असे मला जाणवले.

२ ई. गुरुदेवांच्या कृपेने अंजली आणि शर्वरी यांना नृत्यासाठी सुचवता आलेला भाव !

१. अंजलीला,‘तू गुरुदेवांसमोर नृत्य करत आहेस’, आणि ‘तू स्वतःच दुर्गादेवी आहेस’, या भावाने नृत्य कर. त्यामुळे नृत्यात अपेक्षित असलेला मारक भाव येईल’, असे गुरुदेवांच्या कृपेमुळे मला सांगता आले. ‘देवीच्या कृपेमुळेच तिच्यासाठी स्तुतीपर नृत्य बसवता आले’, यासाठी मला कृतज्ञता वाटत होती.

२. शर्वरीचे कृष्णाच्या स्तुतीवर आधारित नृत्य होते. तिला ‘तुला कृष्णाचे जे रूप आवडते, ते डोळ्यांसमोर ठेव आणि गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांसमोर नृत्य करतांना जो भाव ठेवला होतास, तसाच भाव इथेही ठेव’, असे तिला सांगता आले.

२ उ. अनुभूती

२ उ १. शर्वरीच्या शरिरावर दैवी सोनेरी कण आढळणे : नृत्याच्या सरावाच्या वेळी एक दिवस शर्वरीच्या संपूर्ण शरिरावर दैवी सोनेरी कण आले होते. त्या वेळी या माध्यमातून ‘गुरुदेवांनी तिला आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.

२ उ २. नृत्याच्या चित्रीकरणाच्या वेळी आलेल्या अनुभूती : दोघींना चित्रीकरणासाठी ५ ते ६ वेळा नृत्य करावे लागले.

अ. एरव्ही अंजली नृत्य करते, तेव्हा पहिल्याच वेळेला ती थकते; पण या वेळी तिला थकायला झाले नाही आणि पुढच्या वेळेला अंजलीचे नृत्य पहिल्यापेक्षा अधिक चांगले होत होते. तिचे नृत्य बघतांना ‘देवीच तिला शक्ती आणि ऊर्जा प्रदान करत आहे’, असे मला वाटले.

आ. शर्वरीचे नृत्य पहातांना ‘सगळीकडे आनंद आणि चैतन्य यांची स्पंदने पसरत आहेत’, असे मला वाटले. शर्वरी नृत्य करतांना ‘आपण प्रत्यक्ष गोकुळात आहोत’, असे मला वाटत होते. शर्वरीचे नृत्य बघतांना पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाला आणि सगळी सेवा आनंदाने पूर्ण झाली.

२ ऊ. शिकायला मिळालेली सूत्रे

२ ऊ १. पाठपुरावा घ्यायचे महत्त्व कळणे : नृत्याचे चित्रीकरण झाल्यावर आम्ही ते चलत्चित्र (व्हिडिओ) ‘अपलोड’ केले; पण काही दिवसांनी ‘त्यांना अंजलीच्या नृत्याचे चलत्चित्र मिळाले नाही’, असे कळले. तोपर्यंत पुन्हा चित्रीकरण पाठवण्याची मुदत संपली होती. या प्रसंगात ‘देवाची इच्छा’, असे समजून आम्ही ती परिस्थिती स्वीकारली. त्यातून ‘आपण सतर्कतेने प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा घ्यायला हवा’, हे शिकायला मिळाले.

२ ऊ २. परिस्थिती स्वीकारून शांत राहिल्यावर देवाची कृपा अनुभवता येणे : त्यानंतर दोनच दिवसांनी आम्हाला निरोप आला, ‘काही तांत्रिक अडचणीमुळे अंजलीचे चित्रीकरण त्यांना मिळाले नव्हते. ते आता मिळाले असून अंजलीची उपांत्य फेरीसाठी (‘सेमी फायनल राऊंड’मध्ये) निवड झाली आहे.’ तेव्हा ‘प्रत्येक प्रसंगात देवाची इच्छा समजून कृती केली आणि सगळे स्वीकारले, तर देवाची कृपा अनुभवता येते’, असे शिकता आले. ‘अंजलीला पुन्हा एकदा नृत्यसेवेची संधी मिळाली’, यासाठी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘अंजलीची पुढच्या फेरीसाठी निवड झाली आहे’, असे कळल्यावर समाजातील लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. हे सर्व गुरुदेवांच्याच कृपेमुळे होऊ शकले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. अनुपमा कानस्कर, दुर्ग, छत्तीसगड. (१६.२.२०२१)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक