सातारा येथे होणार ‘जिल्हा पालक संघा’ची स्थापना ?

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, २४ मार्च (वार्ता.) – कोरोनाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांची दादागिरी वाढत आहे. शाळांच्या त्रासाला कंटाळून सातारा येथील पालकांनी संघटित होत लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पालकांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘जिल्हा पालक संघा’ची स्थापना करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी शहरातील रितेश रावखंडे, किशोर सूर्यवंशी, पंकज नागोरी, सुजित जाधव, सौ. श्रुतिका गुजव, सौ. दिप्ती पाटील आदी पालक प्रयत्नशील आहेत.

१. गत वर्षीपासून ५ वीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. ५ वी ते ९ वीपर्यंतच्या शाळा काही कालावधीसाठी चालू झाल्या होत्या; मात्र कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेऊन त्या पुन्हा बंद करण्यात आल्या.

२. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने ‘ऑनलाईन’ शिक्षणाचे आदेश काढले. त्यामुळे सामान्य पालकांना भ्रमणभाष, ‘नेट पॅक’, संगणक आदींचा भुर्दंड सोसावा लागला.

३. शाळा बंद असूनही खासगी शिक्षण संस्थांनी पालकांच्या मागे शाळेचे शुल्क (फी) भरण्यासाठी तगादा लावला आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात न घेता खासगी शाळा व्यावसायिक पद्धतीने शुल्क वसुली करत आहेत.

४. शिक्षकांचे वेतन, शाळा इमारत देखभाल-दुरुस्ती, वीजदेयके आदींचे कारण पुढे करत पालकांवर दबाव आणला जात आहे. तसेच शुल्क न भरल्यास पाल्याची शैक्षणिक हानी होईल, अशी भीती घालणे, शुल्क भरू न शकलेल्या पालकांची व्हॉट्सअ‍ॅप गटावर नावे जाहीर करून त्यांना लज्जित करणे, असे प्रकार शाळा व्यवस्थापनाने चालू केले आहेत.