‘सोनेरी’ राख !
वाढती महागाई आणि त्यामुळे गॅस सिलिंडरचे वाढलेले भाव आदी सर्व गोष्टींचा विचार करता गावांमध्ये पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. सध्याच्या ‘मॉर्डन’ युगात ‘चुलीवर स्वयंपाक करणे’ हे तसे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. स्त्रीहक्काच्या संदर्भात बोलतांना नेहमीच ‘चूल आणि मूल एवढ्यापुरतेच स्त्रीचे आयुष्य मर्यादित नाही’, असे वारंवार सांगण्यात येते. आता गावात ‘कौलारू घर आणि त्यातील स्वयंपाकघरात चुलीवर स्वयंपाक करणारी स्त्री’, असे चित्र अभावानेच दिसून येते. सध्या परिस्थिती म्हणा किंवा लोकांची अपरिहार्यता भारतात पुन्हा ‘चूल संस्कृती’ येऊ घातली आहे. अलीकडे काही हॉटेलमालकांनी ‘अस्सल गावरान पद्धतीने चुलीवर केलेला स्वयंपाक मिळेल’ अशा पाट्या लावून लोकांना चुलीवरील स्वयंपाकाची चव चाखण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता त्याही पुढे जाऊन ‘चुलीवर स्वयंपाक करून घरखर्चाला हातभार लावता येणार’, अशी अभिनव बातमी प्रसारित झाली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोवर्या किंवा लाकडे चुलीत जाळल्यावर जी राख निर्माण होते, तिची ऑनलाईन बाजारामध्ये सध्या चढ्या दराने विक्री केली जात आहे. राखेमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम, सोडियम, मायक्रो न्यूट्रेंट, कॉपर, सल्फर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ मोठी आस्थापने ही राख खतांसाठी आणि भांडी घासण्यासाठी विकत घेत आहेत. पूर्वी चुलीचा वापर झाल्यावर ती स्वच्छ केली जायची आणि ही राख झाडांना किंवा अन्यत्र कुठे तरी टाकली जायची. अजूनही गावाकडे या राखेचा वापर भांडी घासण्यासाठी आणि खतांसाठी केला जातो. जी गोष्ट फार पूर्वीपासून आपल्याला ज्ञात होती, तिच्यावर आज संशोधन केले जात आहे. त्यामुळे दुर्लक्षित राहिलेली गोष्ट आज अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली असून ‘राखे’ची मागणी वाढली आहे. नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांच्या क्षेत्रात असलेली आस्थापने आता छान छान वेष्टनांचा वापर करून राख विकू लागल्या आहेत. त्यामुळे चुलीला आणि त्याहीपेक्षा राखेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आधुनिकता, सुधारणावाद किंवा उच्च जीवनशैली यांच्या मोहापायी भारतात आपल्या दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या अशा कितीतरी गोष्टी आपण त्यागल्या. आज त्याच गोष्टींकडे आपल्याला पुन्हा वळावे लागत आहे.
क्षुल्लक असणार्या राखेचे वाढलेले महत्त्व आणि त्यातून वाढलेले चुलीचे महत्त्व यांवरून ओघानेच भारतीय संस्कृतीवर चर्चा होईलच. भारतीय किंबहुना हिंदु संस्कृतीत मनुष्याच्या गरजा भागवतांना निसर्गाचा विचार केला आहे. निसर्गाकडून आवश्यक तेवढे घेऊन त्याला कुठलीही हानी न पोचवता त्याचा वापर करण्याची शिकवण समाजाला दिली आहे. सध्या दळणवळण बंदीमुळे तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढत आहे. आता शेणाच्या गोवर्या थापणे, त्यांचा वापर करून चूल पेटवणे आणि त्यातून निर्माण झालेल्या राखेची विक्री करून अर्थकारणालाही चालना देता येईल. सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची अशी अनेक गुपिते भारतीय संस्कृतीत दडलेली आहेत. तिचा अंगीकार केल्यास मनुष्याचे जीवन ऐहिक आणि पारमार्थिक दृष्ट्या समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही !