रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांचे रुग्णासमवेतचे निष्ठूर वर्तन पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया
१. एका रुग्णाला साहाय्याची आवश्यकता असतांना रुग्णालयातील कर्मचार्याने ‘रुग्णाला असे साहाय्य केल्यास रुग्ण नाजूक रहाणार’, असे सांगून साहाय्य करण्यापासून परावृत्त करणे
‘३०.१०.२०१८ या दिवशी एका साधिकेला पाठ आणि कंबरदुखीच्या तीव्र त्रासावर उपचार करण्यासाठी एका प्रख्यात आधुनिक वैद्यांकडे नेले होते. त्या वेळी देवाच्या कृपेने मला तिच्यासमवेत जाण्याची सेवा मिळाली. त्या वैद्यांकडे रुग्णांची बरीच वर्दळ होती. आम्ही अगोदरच नावनोंदणी करून ठेवली होती. तेथील वैद्यांनी ताईला तपासून तिची क्ष-किरण तपासणी (एक्स् रे) करण्यास सांगितले. त्यासाठी ताईला तपासणीच्या पटलावर झोपायचे होते. ताईला पाठ, कंबर आणि पायांत असह्य वेदना होत होत्या. तीव्र वेदनांमुळे तिला पाऊल टाकणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे तिला आधार देऊन त्या पटलापर्यंत नेणे आणि त्यावर झोपवणे यासाठी मी अन् समवेतची सहसाधिका साहाय्य करत होतो. त्या वेळी तेथील एक कर्मचारी म्हणाला, ‘‘तुम्ही रुग्णाला जेवढे जपाल, तेवढे तो अधिक नाजूकपणे रहाणार.’’ असे सांगून तो आम्हाला ताईपासून दूर जाण्यास सांगत होता.
त्या वेळी मला वाटले, ‘त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही रुग्णांच्या संदर्भात असू शकते; पण प्रत्येकालाच हा नियम लागू होत नाही. ज्याला खरोखर साहाय्याची आवश्यकता आहे, त्यांच्याशीही निष्ठूरपणे वागणे चुकीचे आहे. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती व्यवस्थित जाणून घेऊन त्याला साहाय्य करणे रुग्णालयातील कर्मचार्यांकडून अपेक्षित आहे.
२. वेदनांमुळे हालचाल करणे कठीण होत असल्याने रुग्णाला पटलावर झोपण्यास उशीर होणे, त्या वेळी आधुनिक वैद्यांनी रुग्णाशी रागाने बोलणे आणि न तपासताच निघून जाणे
ताईला आधार देऊन तपासणीच्या पटलावर बसवून होताच तेथील वैद्य तिला झोपण्यासाठी घाई करू लागले. तीव्र वेदनेमुळे ताईला एकेक हालचाल करणे पुष्कळ कठीण होत होते; पण तिची ही स्थिती समजून न घेता ते म्हणाले, ‘‘तुम्ही झोपण्यासाठी असा वेळ लावणार असाल, तर मी दुसर्या रुग्णाला बघायला जातो. तुमची झोपण्याची वाट बघेपर्यंत माझा दुसर्या रुग्णांना तपासण्याचा वेळ वाया जात आहे’’ आणि ते तेथून निघून गेले.
रुग्णालयात आलेल्या रुग्णाची स्थिती समजून घेणे आणि त्याच्या त्रासानुसार त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे, हेच वैद्यांचे काम आहे, असे असूनही पैशांच्या हव्यासापोटी रुग्णांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणार्या अशा वैद्यांचा कधी तरी आधार वाटेल का ?
३. सनातनचे साधक समोरच्या व्यक्तींचा विचार करून त्यांना साहाय्य करत असल्याने समाजाला त्यांचा आधार वाटणे
याउलट ‘सनातनच्या बालसाधकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच ‘साधकांचाच नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तीचाही कसा विचार करायचा ? त्याची अडचण समजून घेऊन त्याला अधिकाधिक साहाय्य कसे करायचे ?’, हे शिकवले जाते. त्यामुळे आज सनातनचे साधक समाजमनाचा विश्वास संपादन करत आहेत आणि समाजाला सनातनच्या साधकांचा प्रत्येक स्तरावर आधार वाटत आहे. हा प्रसंग पाहून देवानेच माझ्या मनात विचार दिला, ‘सनातनचे साधक प्रत्येक क्षेत्रात आदर्श विचार, उच्चार आणि आचार निर्माण करून ते प्रत्यक्षात कृतीत आणत आहेत; म्हणूनच देवाने हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी साधकांना निवडले आहे.’
– एक साधिका (३०.१०.२०१८)