सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु ताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या ‘विष्णुलीला सत्संगा’चा लाभ करून घेतांना पुण्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना सद्गुरु स्वातीताईंच्या संकल्पाची आलेली प्रचीती !
२८ मार्च २०२१ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मागील २ वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील आणि गोवा राज्यातील सर्व साधकांना सद्गुरु स्वातीताईंचा ‘विष्णुलीला सत्संग’ मिळत आहे आणि ते सर्वजण ही विष्णुलीला अखंड अनुभवत आहेत. या सत्संगामध्ये सद्गुरु स्वातीताई ‘त्या त्या मासात येणारे सणवार, उत्सव या निमित्ताने जिल्ह्यात साधनेच्या आणि प्रसार करतानां साधनेचे कसे नियोजन करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करतात. त्यामुळे समष्टी प्रयत्नांना दिशा मिळते. या सत्संगात जिल्ह्यातील सर्वच साधक सहभागी असतात. त्यामुळे प्रत्येकापर्यंत सर्व सूत्रे पोचतात. अनेक साधकांना वैयक्तिक अडचणी किंवा काही मर्यादा यांमुळे वर्षातून एक-दोन वेळा, तर काही वयस्कर आणि आजारी साधकांना घरी राहूनच सेवा करायला जमते; पण ‘विष्णुलीला सत्संगा’मुळे हे सर्व साधक समष्टीतील सर्व मोहिमांमध्ये त्यांच्या स्थितीनुसार सहभागी होऊ शकत आहेत. सत्संगात अनेक साधक त्यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न सांगतात, उदा. पंचांग वितरण, नियतकालिकांची वाढ आणि नूतनीकरण यांचे प्रयत्न, दीपावलीच्या वेळी आकाशकंदिलांची मागणी मिळवणे, विशेषांकासाठी विज्ञापने मिळवणे, तसेच ग्रंथ वितरण इत्यादी. एकमेकांचे प्रयत्न ऐकून साधकांना प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
या सत्संगामध्ये साधकांना पुढील सत्संगापर्यंतचे ध्येय घेण्यास सांगितले जाते, उदा. सनातन-वहीची मागणी घेणे आणि वितरणासाठी प्रयत्न किंवा एखाद्या नवीन आलेल्या ग्रंथाची, उदा. आपत्कालीन ग्रंथ संचाची वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, तसेच नातेवाईक यांच्याकडून मागणी घेणे. सर्व साधक वैयक्तिक ध्येय घेऊन त्या दिशेने प्रयत्न करतात. सद्गुरु स्वातीताई ‘साधना भावाच्या स्तरावर कशी करायची ?’, याचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे ‘समष्टी सेवेत देवाचे साहाय्य मिळते’, असे सर्व साधक अनुभवत आहेत. परात्पर गुरुदेवांची कृपा, सद्गुरु स्वातीताईंचा संकल्प आणि समष्टी सत्संगातील सर्वांची सकारात्मकता, यांमुळे सत्संगात घेतलेल्या प्रत्येक सूत्राला भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. बर्याच मोहिमांमध्ये ‘न भूतो न भविष्यति ।’ अशी फलनिष्पत्ती सर्वांना अनुभवायला मिळाली. गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, अधिवेशन आदी महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी अर्पणाच्या दृष्टीने प्रयत्न करणे, या उपक्रमांचे निमंत्रण पोचवणे, असे विषयही सत्संगांमध्ये घेतले जातात. त्यामुळे विहंगम प्रसारासाठी दिशा लाभते.
मार्च २०२० पासून चालू झालेल्या दळणवळण बंदीच्या काळातही हा सत्संग अखंड चालू होता. त्यामुळे ऑनलाईन चालू असलेले सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग यांचा प्रसार करणे, साधकांचे नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित उद्योजक अन् युवा साधक यांच्यासाठी विविध शिबिरे ठरवणे, शौर्यजागृती व्याख्याने, प्रथमोपचार शिबिर इत्यादींचे आयोजन, प्रसार, तसेच या शिबिरांतून संपर्कात आलेल्या जिज्ञासूंना जोडून ठेवणे, यांविषयीचे प्रयत्नसुद्धा साधक सत्संगांत सांगतात. त्यामुळे ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग, शिबिरे, तसेच सत्संग यांची घडी चांगल्या रितीने बसून ते सर्व जीव गुरुकार्याशी जोडले गेले आहेत.
‘हा ‘विष्णुलीला सत्संग’ आध्यात्मिक स्तरावरच होतो’, याची प्रत्येक आठवड्याला अनुभूती येते. सत्संग चालू असतांना काही साधकांना घरात प्रकाश वाढल्याचे जाणवते, कधी दैवी सुगंध येतो, तर कधी ‘हा सत्संग विष्णुलोकातच चालू आहे’, असे जाणवते. या सत्संगामुळे अनेक साधकांचे व्यष्टी साधना, तसेच समष्टी सेवा यांचे प्रयत्न वाढले आहेत. पुणे जिल्ह्यातील साधकांनी अर्पिलेली निवडक कृतज्ञतापुष्पे गुरुचरणी अर्पण करते.’
– सौ. मनीषा पाठक, पुणे
१. ‘विष्णुलीला सत्संगा’मुळे साधकांचे समष्टी साधनेचे झालेले विहंगम प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती
१ अ. विष्णुलीला सत्संगामुळे कोणत्याही सेवेचा ताण न वाटता सेवा सहज होणे : ‘विष्णुलीला सत्संगातून सद्गुरु स्वातीताई समष्टी साधनेच्या अनुषंगाने जे जे सूत्र सांगतात, तशी सेवा केली, तर देवच सगळं करून घेत आहे’, असे जाणवते. सत्संग आणि सेवा यांच्या माध्यमातून वाचक आणि हितचिंतक यांना जोडून ठेवण्याची सेवा गुरुदेवांनी करून घेतली. काही वाचक पोस्ट पाठवणे, फलक लिहिणे, अशा सेवांमध्ये सक्रीय होत आहेत, त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. सद्गुरु ताईंचा संकल्प अनुभवता येतो. या सत्संगामुळे आता कोणत्याही सेवेचा ताण वाटत नाही. सेवा सहज होतात.’
– सौ. शकुंतला चौधरी, कोथरूड
१ आ. वाचकांना सेवेसाठी उद्युक्त करणार्या सौ. अश्विनी सेलूकर ! : ‘मला सत्संगामध्ये बोलायला भीती वाटायची; परंतु सद्गुरु ताईंनी ‘गुरुचरणी आत्मनिवेदन करूया’, असे म्हटल्यावर आपोआपच माझी भीती न्यून होऊन मी सत्संगात सहभागी होऊ लागले. मला योग्य शब्द आपोआपच सुचू लागले. माझा भाव जागृत होऊ लागला. सद्गुरु ताईंच्या सत्संगामुळे परिस्थिती स्वीकारता येऊ लागली. वाचकांना सेवेसाठी उद्युक्त करण्याचे प्रयत्न गुरुदेवच करवून घेत आहेत. काही वाचक आता ‘पोस्ट’ पाठवणे, ‘पी.डी.एफ्.’ पाठवणे, फलकप्रसिद्धी आदी सेवा करत आहेत.
१ आ १. वाचक सौ. लक्ष्मी पाटील यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न : सौ. लक्ष्मी पाटील या ‘सनातन प्रभात’च्या वाचक आहेत. त्यांनी त्यांच्या शेजारील जिज्ञासू सौ. राजश्री कोकणे यांना साधनेचे महत्त्व सांगितले. तेव्हापासून त्याही नियमितपणे सत्संगाला उपस्थित रहात आहेत. ‘सद्गुरु ताई, आपल्या सत्संगामुळे समष्टी प्रयत्नांना प्रेरणा मिळत आहे. ‘तात्त्विक ज्ञान कृतीमध्ये कसे आणायचे ?’, हे आपल्यामुळे शिकता येत आहे. आपण समष्टी सेवेचे प्रयत्न करायलाच हवेत, अशी माझी तळमळ वाढली असून अंतर्मुखताही पुष्कळ वाढली आहे.’
– सौ. अश्विनी सेलूकर, कोथरुड
१ इ. सत्संगामुळे सकारात्मक राहून भावपूर्ण सेवा करण्याची प्रेरणा मिळते : ‘सत्संगामुळे सकारात्मक राहून सेवा करण्याची प्रेरणा मिळते. ‘आपण अजून कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, हे लक्षात येते. त्यामुळे व्यष्टी साधना आणि समष्टी सेवेलाही चालना मिळते. आता माझ्याकडून भावपूर्ण सेवा करण्यासाठी प्रयत्न होतात. या सत्संगामुळे सकारात्मक रहाता येत आहे.
माझ्याकडे फलकप्रसिद्धीच्या सेवेचे दायित्व आहे. ‘६ फेब्रुवारीच्या सभेनिमित्त फलकप्रसिद्धी करू शकतो’, असे सत्संगामध्ये सांगितल्यावर मी १०० ठिकाणी फलकप्रसिद्धी करण्याचे ध्येय घेतले. अनेक साधकांशी बोलून त्यांना ही सेवा करण्यास उद्युक्त केले. साधकांनीही पुष्कळ चांगले प्रयत्न केले. सध्या बरेच साधक ही सेवा करत आहेत.’
– सौ. गीता देशपांडे, कोथरुड
(क्रमशः)
गुरुचरणी, सौ. मनीषा पाठक, पुणे (२१.२.२०२१)
उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/462486.html
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |