संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेच्या विरोधातील प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी भारत अनुपस्थित !
श्रीलंकेतील तमिळींवर होत असलेल्या अत्याचारांचे प्रकरण
श्रीलंकेला चीनपासून लांब ठेवण्यासाठी भारताची ही कूटनीतीक खेळी असूही शकेल; मात्र अशाने तेथील तमिळी लोकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा कधी फोडणार ? पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी शेजारी देशांतील हिंदूंना कुणीही वाली नाही. तसेच आता श्रीलंकेतील हिंदूंचीही स्थिती होणार आहे का ? भारत सरकारने श्रीलंकेतील तमिळी हिंदूंना आश्वस्त करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – श्रीलंका सरकार तेथील तमिळी वंशाच्या नागरिकांवर अत्याचार करत असल्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या मतदानाच्या वेळी भारत अनुपस्थित राहिला. श्रीलंकेने या प्रस्तावावर भारताचे सहकार्य मागितले होते. त्यासाठी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरूनही चर्चा केली होती; मात्र भारताने श्रीलंकेला थेट सहकार्य न करता मतदानाच्या वेळी अनुपस्थिती दर्शवली.
India abstained during voting on a resolution against #SriLanka for #warcrimes against Tamils at #UNHRC in Geneva.@xpresstn https://t.co/dN18OCNRMq
— The New Indian Express (@NewIndianXpress) March 23, 2021
‘श्रीलंका सरकार तमिळींवर अत्याचार करत मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, या प्रस्तावाच्या बाजूने भारताने मतदान केले असते, तर श्रीलंका अप्रसन्न होण्याची अधिक शक्यता होती. त्यातून श्रीलंकेने पुन्हा एकदा चीनच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला असता. तसेच भारताने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले असते, तर तमिळनाडूमधील तमिळ नागरिक अप्रसन्न झाले असते, असे राजकीय तज्ञांनी म्हटले आहे.