परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या काळात राजस्थान येथील साधिकांना आलेल्या अनुभूती
१. श्रीमती आशा राठी, जयपूर
१ अ. कार्यक्रम पहातांना भाव जागृत होणे : परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. त्या दिवशी माझी प्रत्येक सेवा भावपूर्ण होत होती आणि माझे मन शांत होते.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर त्यांनी पुढे केलेले बोट नीट पकडता न येणे आणि आर्ततेने त्यांचा धावा केल्यावर त्यांनी (सूक्ष्मातून) बोट पकडल्याचे जाणवून आनंद होणे : कार्यक्रम पहातांना ‘गुरुचरणांची प्राप्ती करणे’, हाच जीवनाचा उद्देश असल्यामुळे आता साधनेविना काहीच नको’, असे मला वाटत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना झाली, ‘तुम्हीच माझा हात पकडा आणि माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घ्या.’ तेव्हा गुरुदेवांनी स्मित हास्य केले आणि आपल्या हाताचे बोट पुढे केले. मी त्यांचे बोट पकडले; पण माझ्याकडून ते सारखे सुटत होते. त्यामुळे मी परात्पर गुरुदेवांना म्हटले, ‘गुरुदेवा, तुम्हीच माझे बोट पकडा.’ त्यांनी माझे बोट पकडले नाही; म्हणून मी रडू लागले. त्या वेळी ‘गुरुदेवांपर्यंत माझी प्रार्थना पोचत नाही’, हे माझ्या लक्षात आले; म्हणून मी ‘गुरुदेवा, माझ्या जीवनाचा अंतिम क्षण आला आहे. पुन्हा तुमचा धावा करण्याची संधी मिळेेल कि नाही ?’, हे ठाऊक नाही’, अशी आर्तभावाने प्रार्थना केली आणि परात्पर गुरुदेवांनी माझे बोट पकडले. तेव्हा ‘आता मला आणखी काहीच नको’, असे वाटून पुष्कळ आनंद झाला.
१ इ. दुसर्या दिवशी जन्मोत्सव कार्यक्रम पहातांना ‘मी भावगंगेत नहात आहे’, असे वाटत होते.
१ ई. झालेला त्रास – पोटाच्या डाव्या भागात वेदना होणे : जन्मोत्सवाच्या तिसर्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या पोटाच्या डाव्या बाजूला पुष्कळ वेदना होत होत्या. मी सेवाही कशीबशी करत होते. मला रांगोळी काढण्याची सेवा केल्यावर थोडेसे बरे वाटले. नंतर जन्मोत्सव कार्यक्रम पहातांना मला मधे मधे झोपावे लागत होती. संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर मला थोडे बरे वाटले. माझे मन दिवसभर शांत होते.
२. कु. यशिका राठी, जयपूर
२ अ. ‘साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, असे वाटून कृती करण्याची जाणीव होणे : जन्मोत्सवाच्या दिवशी संतांचे मार्गदर्शन ऐकले आणि ‘माझे साधनेचे प्रयत्न अल्प होत आहेत’, असे वाटून मला निराशा आली. ‘साधकांनी साधनेचे प्रयत्न करत रहावे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांंना अपेक्षित आहे’, याची मला जाणीव झाली.
२ आ. स्वभावदोष निर्मूलन होण्यासाठी प्रयत्न करतांना परात्पर गुरुदेवांंच्या संकल्पामुळे मनातील ईर्ष्येचे विचार नष्ट होत असल्याचे जाणवणे : ‘साधना हे कृतीचे शास्त्र आहे. त्यामुळे कृती करणे आवश्यक आहे’, हे लक्षात घेऊन मी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी सारणी लिखाणाला आरंभ केला. ‘ईर्ष्या करणे’ हा स्वभावदोष दूर करण्यासाठी मी प्रयत्न चालू केले आणि मला सारणी लिखाण करतांना आनंद मिळू लागला. ‘हे स्वभावदोष एवढे सूक्ष्म असतात की, ते कधीही प्रकट होतात. ‘हे स्वभावदोष दूर कसे होतील ?’, असे विचार माझ्या मनात यायचे; परंतु आता असे विचार येणे बंद झाले आहे. परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या संकल्पाने माझ्या मनातील ईर्ष्येचे विचार नष्ट केले. त्यामुळे माझ्या मनात सर्वांविषयी प्रेमभाव निर्माण झाला आहे. यासाठी मी श्री चरणी कृतज्ञ आहे.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |