विनाअनुमती लाकूड वाहतूक केल्याने २ जणांवर गुन्हा नोंद
६ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन
सातारा, २३ मार्च (वार्ता.) – वन विभागाच्या सातारा येथील भरारी पथकाने कराड येथील सोपान लक्ष्मण पन्हाळे, तर पाटण येथील सुरेश मारुति देशमाने या २ जणांना विनाअनुमती लाकूड वाहतूक करतांना पकडले आहे. त्यांच्याकडून वाहनांसह ६ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.
कराड आणि पाटण येथून मोठ्या प्रमाणात लाकडांची चोरी होत असल्याची माहिती वन विभागाच्या सातारा येथील भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पाटण तालुक्यात गस्त घालत असतांना बांबवडे-तारळे रस्त्यावर आंबळे गावच्या सीमेत विनाअनुमती करंज लाकडाची वाहतूक चालू असल्याचे निदर्शनास आले. कराड तालुक्यातही अशाच प्रकारे रात्री गस्त घालते वेळी चरेगाव-म्होप्रे रस्त्यावर भोळेवाडी येथेही लाकडाची विनाअनुमती वाहतूक चालू होती. वन अधिकार्यांनी वाहनासह लाकूड शासनाधीन केले असून दोघांवर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.