हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त !
जळगाव, २३ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील युवकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखील कदम यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थित युवक-युवतींना संबोधित केले. युवकांशी संवाद साधतांना श्री. जुवेकर म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारे अनेक क्रांतीकारक आणि साहित्यिक या देशाच्या इतिहासात होऊन गेले; पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा क्रांतीवीर साहित्यिक म्हणजे ‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच !’ याप्रमाणे सर्वांचे मेरूमणी होय. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण कृतीशील होणे’, हीच खरी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती कृतज्ञता ठरेल !’’
यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उपयोगात आणलेल्या वस्तू, तसेच अंदमान येथील कारागृहातील सावरकरांची कोठडी, त्यांनी सहन केलेल्या यातना इत्यादी विषयांचे छायाचित्र प्रदर्शन उपस्थितांना दाखवण्यात आले.
युवकांनी सांगितले, ‘‘असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत. आजच्या कार्यक्रमातून आम्हाला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात कृतीशील होण्याची प्रेरणा मिळाली.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती शिरसाट यांनी केले.